हे काही हृदयविकाराचा झटका येण्याचं वय नव्हतं. के वीरमणी गेला तेव्हा त्यानं वयाची पस्तिशीही ओलांडली नव्हती.

“आम्ही रानात होतो, आणि तो अचानक कोसळला...” वीरमणीची बायको आपल्या कडमनकुडी गावातल्या घरी आमच्याशी बोलत होती. आपला नवरा इतक्या कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने कसा काय गेला हेच तिला उमगत नाहीये. त्याची तब्येत उत्तम होती, पण खूप ताण-तणाव होते.

३० डिसेंबर २०१६ रोजी दोघं जण त्यांच्या रानात गेले. सव्वा एकराचा तुकडा गावातल्या एकाकडून पहिल्यांदाच या दलित कुटुंबाने पट्ट्याने कसायला घेतला होता. रानात भात आणि इतर काही पिकं होती ते पहायला दोघं गेले होते.

४ वाजायच्या सुमारास तो अचानक खाली कोसळल्याचं तिनं पाहिलं. “काय झालंय ते पहायला मी धावत गेले, तर तो कसलीच हालचाल करत नव्हता, प्रतिसाद देत नव्हता.” ती सांगते. कविताने इतरांच्या मदतीने त्याला अॅम्ब्युलन्सने नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी तिला सांगितलं. त्यांच्या मते हा कसला तरी धक्का बसल्याने झालेला मृत्यू होता.

आता सगळी जबाबदारी कवितावर येऊन पडलीये. पाच वर्षांची दिव्यदर्शिनी आणि अडीच वर्षांची नित्यश्री या दोघी मुलींचं तिलाच करायचंय. काय घडलं हे अजूनही तिला समजू शकलेलं नाही. “(२०१६ साली) पाऊस पडला नाही हे आमचं कमनशीब.” ती म्हणते. “घर चालवण्यासाठी स्वतः शेती करावी या इराद्याने आम्ही पहिल्यांदाच जमीन भाडेपट्ट्यावर घेतली आणि नेमकं तेच शेतीसाठी सगळ्यात वाईट वर्ष ठरावं...”

In Kadamankudi village, Kavitha, K. Veeramani's widow, is still trying to fathom what happened, and how he could suddenly die of a heart attack at the age of 35
PHOTO • Jaideep Hardikar

कडमनकुडी गावात के वीरमणीचा विधवा पत्नी, कविता अजूनही जे घडलं त्याची संगती लावण्याचा प्रयत्न करतीये. वयाच्या ३५ व्या वर्षी तो असा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कसा काय जाऊ शकतो?

दर साली वीरमणी आणि कविता इतरांच्या रानात मजुरी करून कसंबसं पोटापुरतं कमवायचे. एकच स्वप्न बघत, एके काळी ‘वर्षाला तीन पिकं देणारा भाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात आपलं स्वतःचं शेत असेल.

पण २०१६ मध्ये खरिपाच्या आणि रबीच्या – दोन्ही पेरण्या वाया दुष्काळामुळे वाया गेल्या. कावेरीच्या खोऱ्याच्या पूर्वेच्या टोकावर असणाऱ्या नागपट्टिनम जिल्ह्याच्या कडमनकुडी गावातच नाही तर अख्ख्या तमिळ नाडूमध्ये हेच चित्र होतं.

अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावलेला वीरमणी हा एकटाच नाहीये. इथून ४० किमी अंतरावरच्या थिरुवायूर जिल्ह्यातल्या अदिचापुरम गावातली अरोग्यमेरीची कहाणी अगदी अशीच.

तिचा नवरा, टी. अळगेशन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जाईल असं कुणाच्या स्वप्नातही आलं नव्हतं. फक्त ३६ वर्षांचा होता तो, पाणावलेल्या डोळ्यांनी अरोग्यमेरी सांगते. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी तो दुपारचा रानात गेला आणि सुकत चाललेल्या पिकामध्येच जमिनीवर कोसळला. थिरुवायूरच्या रुग्णालयात आणेपर्यंत तो गतःप्राण झाला होता.

After T. Azhagesan's unexpected heart attack at the age of 36, his wife Arokyamary and his family have been pitchforked into a financial and emotional quagmire
PHOTO • Jaideep Hardikar

टी. अळगेशन वयाच्या ३६ व्या वर्षी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. त्याची पत्नी अरकोयामेरी आणि त्याचं कुटंब आता आर्थिक आणि भावनिक कोंडीत सापडले आहेत

अळगेशन, भूमीहीन आदिवासी शेतकरी. २०१६-१७ मध्ये २ एकर रान पट्ट्याने कसायला घ्यायचं ठरवतो. आणि नेमका हाच काळ गेल्या संपूर्ण शतकातल्या सगळ्यात भीषण दुष्काळांपैकी एक ठरतो.

त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबाभोवती आर्थिक विवंचना आणि भावनिक ताणाचा विळखा पडलाय. अळगेशनची आई, ७० वर्षांची अमृतवल्ली आता घरातली कमवती व्यक्ती आहे. ती शेजारच्या शाळेत  ती झाडायचं काम करते, ज्याचे तिला महिन्याला ३००० रुपये मिळतात. तिच्या किशोरवयीन, शाळेत जाणाऱ्या नातवंडांसाठी – अळगेशन आणि अरोग्यमेरीच्या दोघी मुली आणि एका मुलासाठी – तिला काम करावंच लागणार आहे.

अळगेशनने अरोग्यमेरीला कधीही रानात काम करू दिलं नाही. कुणी नोकरी मिळवून द्यायला मदत केली तर ती अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करू शकते असं ती नेटाने सांगते. अळगेशनचे शेतमजूर असणारे वडील थैंगय्यांनी किती तरी वर्षांपासून काम करणं थांबवलं आहे.

या कुटुंबाला शासनाकडून कसलंही अनुदान मिळालेलं नाही आणि त्यांना लघुवित्त संस्थांकडून घेतलेली ४०,००० ची दोन कर्जं फेडायची आहेत. ही दोन कर्जं अळगेशनची पत्नी आणि आईच्या नावाने उचलली आहेत. “आम्ही आमचे सगळे दागिने गहाण ठेवलेत, नातेवाइकांकजून हात उसने पैसे घेतलेत,” अरोग्यमेरी सांगते.
Arokyamary and her mother-in-law
PHOTO • Jaideep Hardikar
The passbooks of the microcredit institutions
PHOTO • Jaideep Hardikar

अरकोयामेरी आणि तिच्या सासूवर (फोटोमध्ये अळगेशनच्या वडीलही दिसतायत) आता कुटुंबावरचं कर्ज फेडायची जबाबदारी येऊन पडली आहेय उजवीकडेः लघुवित्त संस्थांची पासबुकं

या भागातलं शेती संकट आणि त्यातून होणाऱ्या या दुःखद घटनांच्या बातम्या येऊ लागल्यावर जानेवारी २०१७ मध्ये पीपल्स सुनियन ऑफ सिविल लिबर्टीज च्या गटाने कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूची कारणं तपासायला सुरुवात केली. या गटामध्ये शेतीक्षेत्रातले कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, डॉक्टर आणि इतर सदस्य होते.

“आम्ही अकस्मात मृत्यूच्या ५० घटना तसंच आत्महत्यांचा आणि या खोऱ्यातल्या नागपट्टिनम, थिरुवायूर आणि तंजावूर जिल्ह्यातल्या परिस्थितीचा अभ्यास केला,” डॉ. भारती सेल्वन सांगतात. ते थिरुवारूर जिल्ह्यातल्या मन्नारगुडीमध्ये हृदयतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत आणि या अभ्यागटाचे सदस्य आहेत.

डॉ. सेल्वन सांगतात की त्यांनी या भागात अशा प्रकारच्या घटना आजतागायत कधीही पाहिल्या नाहीयेत. “जे गेले त्यातल्या बहुतेकांना हृदयाचा कसलाही आजार नव्हता, बरेचसे तरुण वयातले होते. या घटनांचा संबंध आपण घरच्या आणि शेतीसंबंधी ताणतणावांशी लावू शकतो. शासनाने जरी मान्य केलं नसलं तरीही या मृत्यूंचा अचानक उद्भवलेल्या मानसिक ताणाशी संबंध आहे तसंच आर्थिक संकटामुळे हे मृत्यू झाले आहेत असं मानण्यासाठी आमच्याकडे पुरेशी कारणं आहेत. संकट गहिरं होत आहे आणि सरकारची अनास्था स्पष्ट दिसून येत आहे.”

तमिळ नाडू सरकारचं मात्र असं म्हणणं आहे की हे मृत्यू सध्याच्या दुष्काळाशी किंवा शेती संकटाशी संबंधित नाहीत. कौटुंबिक समस्या, आजारपणं किंवा अकस्माक, अपघाती मृत्यू म्हणूनच सरकार त्याचा विचार करत आहे. स्थानिक शेतकरी गटांच्या अंदाजानुसार जानेवारी ते जून २०१७ या काळात हृदयविकाराच्या झटक्यामुळे अकस्मात मृत्यूच्या एकूण २०० घटना घडल्या असल्या तरी हे चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत त्या वेगळ्याच. एकट्या डिसेंबर २०१६ मध्ये १०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं मानवी हक्क आयोगाने ५ जानेवारी २०१७ रोजी राज्य सरकारला पाठवलेल्या सूचनेवरून दिसून येतं. आयोगाने म्हटलं आहे की यातल्या बहुतेक घटना कावेरी खोऱ्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये घडल्या आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यांची एकूण लोकसंख्या ८ कोटी आहे.

राज्य सरकार जरी अजूनही हे नाकारत असलं तरी वास्तव हे आहे की इतक्या कमी कालावधीत या भागात मानसिक धक्का बसल्याने झालेल्या मृत्यूंसाठी सगळ्यात जास्त कारणीभूत आहे तो म्हणजे दुष्काळ. मार्च २०१७ मध्ये शासनाने स्वतःच तमिळ नाडूच्या ३२ पैकी २१ जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत.

दर वर्षी तमिळ नाडू, आंध्र प्रदेशचा समुद्री भाग, दक्षिण कर्नाटक आणि केरळ राज्यांना ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात झोडपून काढणारा ईशान्य मोसमी किंवा परतीचा पाऊस २०१६ मध्ये कोरडा गेला. काही जिल्ह्यांमध्ये जुलै ते सप्टेंबर या काळात येणारा मॉन्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. पण २०१६ मध्ये राज्यात नैऋत्य आणि ईशान्य मोसमी पावसात ६० टक्के घट दिसून आली. दोन्ही मोसमी पाऊस कमी झाल्याने २०१६ मध्ये तमिळ नाडूत रबीची भात लागवड ३० टक्क्यांनी घटली आणि उत्पन्न ६० टक्क्यांनी, असा अंदाज राज्याच्या कृषी खात्याने व्यक्त केला आहे.
A dry tank in in Kadamankudi village
PHOTO • Jaideep Hardikar

कडमनकुडी गावातलं कोरडा पडलेला तलाव. कधी काळी उदंड पाणी असणाऱ्या कावेरीच्या खोऱ्यातले तलाव २०१६-१७ च्या दुष्काळात कोरडेठाक पडले आहेत.

गेल्या हंगामात – ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०१७ – तमिळ नाडूमध्ये तब्ब्ल ३५ लाख हेक्टर कृषीक्षेत्राला तीव्र किंवा मध्यम दुष्काळाचा फटका बसला आहे असं एकात्मिक दुष्काळ तीव्रता निर्देशांक (Integrated Drought Severity Index- IDSI) सांगतो. हे तमिळ नाडूच्या एकूण क्षेत्राच्या ३०% इतकं क्षेत्र आहे.

हे सगळं क्षेत्र कधी काळी अत्यंत सुपीक असणाऱ्या कोवेरी खोऱ्यात येतं, जिथे तीन तीन पिकं निघायची. साधारणपणे २० वर्षांच्या काळात, पाण्याच्या टंचाईमुळे केवळ दोनच पिकं येऊ लागली. २०१६-१७ मध्ये गेल्या शंभर वर्षांत पहिल्यांदाच या कधी काळी जलसंपन्न असणाऱ्या क्षेत्रातले शेतकरी भाताची एकही पेरणी करू शकले नाहीत आणि त्यांच्या हाती पीक आलं नाही. दुष्काळात तेरावा तसं कावेरीचं तमिळ नाडूच्या वाटचं पाणी कर्नाटक सरकारने त्यांच्याकडच्या दुष्काळामुळे सोडलंच नाही.

यामुळे पिकांचं झालेलं नुकसान विनाशकारी आहे.

गवताने शाकारलेल्या छोट्याशा झोपडीत, घरात शिरताच डावीकडच्या भिंतीवर कोपऱ्यात वीरमणीचा फोटो अडकवलाय. कवितानं आम्हाला दाखवलेली वीरमणी आणि शेतमालकातल्या कराराची प्रत खरं तर सब-लीजची आहे. त्याने पट्टयाने घेतलेली जमीन खरं तर एका धार्मिक संस्थेच्या ट्रस्टची आहे. ज्याच्याकडून वीरमणीने जमीन भाड्याने घेतली तो खरं तर फक्त एक दलाल आहे. भाडेकरार दोन वर्षांचा आहे आणि दर वर्षी २५००० रुपये आकारण्यात येतील असं करारामध्ये असं नमूद केलंय. अळगेशननेही अशाच प्रकारचा करार केला होता.

याचा अर्थ हा की वीरमणी आणि अळगेशनला बँकांकडून कमी व्याजदराने कर्ज मिळू शकलं नाही कारण जमीन त्यांच्या नावावर नव्हती. पीककर्ज मिळण्यासाठीची ती महत्त्वाची अट आहे.

“आम्ही कधीच शाळेत गेलो नाही,” कविता म्हणते. “आम्हाला आमची पोरं शाळेत पाठवायची होती, त्यामुळे आम्ही जमीन पट्ट्याने घेऊन कसायची आणि त्यातून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावता येईन एवढं कमवायचं असा निर्णय घेतला.” पण फासे उलटेच पडले.

कविताला अनुदान म्हणून शासनाकडून ३ लाख रुपये मिळाले. राजकीय दबावामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना हे अनुदान मिळाल्याचं बोललं जात आहे. तिने लघुवित्त संस्थेकडून घेतलेले ५०,००० आणि इतर काही देणी फेडली आहेत.

“हाच पैसा आधी आमच्या मदतीला आला असता, तर माझ्या नवऱ्याने मरण कवटाळलं नसतं.” कविता खेदाने म्हणते.

अनुवादः मेधा काळे

Jaideep Hardikar

জয়দীপ হার্ডিকার নাগপুর নিবাসী সাংবাদিক এবং লেখক। তিনি পিপলস্‌ আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়ার কোর টিম-এর সদস্য।

Other stories by জয়দীপ হার্ডিকর
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে