आज १ मे, कामगार दिन, पण बंगळूरू मेट्रो प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांना मार्चपासून त्यांचं वेतन मिळालेलं नाही आणि ते भयभीत होऊन जगत आहेत. खेदाची बाब म्हणजे या मेट्रोला म्हणतात, नम्म मेट्रो (आपली मेट्रो) (आज प्रदर्शित होणारा) सबूत/ एव्हिडन्स हा १३ मिनिटांचा बोधपट टाळेबंदी दरम्यान शहरातील मेट्रो कामगारांचा प्रवास दाखवतो. पर्यायाने, स्थलांतरित कामगारांच्या राहण्याची व कामाची दशा अधोरेखित करतो.
"भीती वाटतेय. घरी मेलो तर काही हरकत नाही. इथे जीव गेला, तर आमची कोणीच देखभाल करणार नाही," एक कामगार म्हणतो. आपलं गाव सोडून त्याला सात महिने झालेत. त्यात टाळेबंदीमुळे त्याचं आपल्या कुटुंबाला भेटणं लांबणीवर पडलंय. त्याच्या बहुतेक सहकाऱ्यांना असंच वाटतं. सगळे टिनाच्या घरांमध्ये, एका खोलीत १०-१५ जण मिळून राहतात. त्यातच सामाजिक अंतर पाळण्याचा प्रयत्न करतात.
२९ एप्रिल रोजी गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार
अडकून पडलेल्या प्रवासी श्रमिकांना घरी परतण्यासाठी कर्नाटक शासनाने ३० एप्रिल रोजी
सोय करून देण्याचं घोषित केलं. पण अजून एकानेही मेट्रो कामगारांशी संपर्क साधला नाही.
हा बोधपट कामगारांनी स्वतः कथन केलाय. कोरोना व्हायरसपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी आपले चेहरे मास्कने झाकले आहेत. पण सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक संकटांचं काय? या बोधपटात हाच प्रश्न मांडण्यात आलाय: त्यांना या संकटापासून कोण वाचवणार, आणि कसं?
लेखन व दिग्दर्शन: यशस्विनी व एकता
सहभाग: बंगळूरू मेट्रोचे कामगार
छायांकन व संकलन: यशस्विनी