आपल्या नवजात बाळाचं नाव काय ठेवायचं याच्या आम्हा आदिवासींच्या काही प्रथा आहेत. नद्या, जंगलं, जमीन, आठवड्याचे वार किंवा एखादा विशिष्ट दिवस किंवा मग आमच्या पूर्वजांवरून आम्ही बाळाचं नाव ठेवतो. पण सरत्या काळात आमचं नाव काय असावं हा हक्कच आमच्यापासून हिरावून घेतला गेला. एकछत्री धर्म आणि धर्मांतराने आम्हाला हा हक्क नाकारला. आमची नावं बदलली, आम्हाला नवी नावं दिली गेली. आदिवासी मुलं शहरातल्या आधुनिक शाळांमध्ये गेली तेव्हा संघटित धर्माने आमची नावंच बदलून टाकली. आम्हाला प्रमाणपत्रं मिळाली त्यावर ही बदललेली नावं घातली गेली. आमच्या भाषा, आमची नावं, आमची संस्कृती आणि आमचा इतिहास अशाच रितीने उद्ध्वस्त केला गेला. या ‘नामकरणा’मागे मोठं कारस्थान आहे. आज ज्या भूमीत आमची मुळं रुजली आहेत तिचा आणि आमच्या इतिहासाचा आम्ही शोध घेतोय. आमच्या अस्तित्वाच्या खुणा असलेले दिवस आणि वार आम्ही खोदून काढतोय.
यह किसका नाम है?
मैं सोमवार को जन्मा
इसलिए सोमरा कहलाया
मैं मंगलवार को जन्मा
इसलिए मंगल, मंगर या मंगरा कहलाया
मैं बृहस्पतिवार को जन्मा
इसलिए बिरसा कहलाया
मैं दिन, तारीख़ की तरह
अपने समय के सीने पर खड़ा था
पर वे आए और उन्होंने मेरा नाम बदल दिया
वो दिन, तारीखें सब मिटा दी
जिससे मेरा होना तय होता था
अब मैं रमेश, नरेश और महेश हूं
अल्बर्ट, गिलबर्ट या अल्फ्रेड हूं
हर उस दुनिया के नाम मेरे पास हैं
जिसकी ज़मीन से मेरा कोई जुड़ाव नहीं
जिसका इतिहास मेरा इतिहास नहीं
मैं उनके इतिहास के भीतर
अपना इतिहास ढूंढ़ रहा हूं
और देख रहा हूं
दुनिया के हर कोने में, हर जगह
मेरी ही हत्या आम है
और हर हत्या का कोई न कोई सुंदर नाम है ।
हे नाव कुणाचं?
माझा जन्म सोमवारचा
म्हणून मी सोमरा
मी मंगळवारी जन्मलो म्हणून
मंगल, मंगर किंवा मंगरा झालो
माझा जन्म झाला बृहस्पतीवारी
म्हणून मी झालो बिरसा
दिवस आणि वार असतात
तसा मी देखील काळाच्या ऊरावर उभा होतो
पण ते आले आणि त्यांनी माझं नावच बदलून टाकलं
ज्या दिवस-वारांवर माझं अमिट अस्तित्व होतं
तेच त्यांनी पुसून टाकले
आता मी आहे रमेश, नरेश किंवा महेश
अल्बर्ट, गिलबर्ट किंवा अल्फ्रेड
अशा सगळ्या दुनियेची नावं आहेत माझी
ज्या भूमीत माझी मुळंच नाहीत
जिचा इतिहास माझा इतिहासच नाही
त्यांच्या इतिहासात
मी माझा इतिहास शोधतोय आता
आणि एकच दिसतंय
जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात
माझी हत्या नवीन नाही
आणि या हत्येचं सुंदरसं नाव मात्र आहेच
कवितेचा इंग्रजी अनुवादः प्रतिष्ठा पंड्या
मराठी अनुवादः मेधा काळे