दर बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून आसपासच्या गावातील आदिवासी आमाबेडाच्या आठवडी बाजाराला (‘हाट’) पोचू लागतात. “सुमारे ४०-४५ गावातले लोक इथे येतात, या भागातला हा मुख्य बाजार आहे,” इथला एक गोंड आदिवासी कार्यकर्ता सुकाय कश्यप सांगतो. दूरच्या गावांतून किराण्याची दुकाने नसल्यामुळे लोक आठवड्याभरासाठी लागणारे धान्य आणि इतर आवश्यक वस्तू घ्यायला छत्तीसगडच्या (उत्तर बस्तर) कांकेर जिल्ह्यातील अन्तागढ तालुक्यातल्या या बाजारात येतात.
पाखांजूर तहसिलातील भाजी आणि मासे विकणारे, केशकाल तसेच धानोरा तालुक्यातील व्यापारी – साधारण ३० किमीच्या परिघातील मंडळी - इथे येतात. बटाटे, कांदे, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, मिरची यांसारख्या भाज्या इथे असतात. अनेक आदिवासी नाचणी, इतर हरक धान्ये आणि तांदूळ आणतात तर काहीजण मोहाची फुलं आणतात. बांबूचे झाडू आणि जंगलातील इतर उपजही विकायला येते. कुणी मसाले, तेल आणि साबण विकतात. कुंभार मातीच्या वस्तू आणतात, लोहार शेतीची आणि इतर कामाची अवजारे विकतात. दूरच्या प्रांतातून येणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे हा बाजार गेल्या काही वर्षांत वाढला आहे. घड्याळे, प्लास्टिकच्या बादल्या आणि मग, छोटे दागिने, केसांच्या क्लिपा आणि बरंच काही...बॅटरीवर चालणारे ट्रांझिस्टर रेडिओ, चार्जर आणि वेगवेगळ्या आकाराच्या विजेऱ्या (संध्याकाळी किंवा रात्री जंगलातील अंधाऱ्या रस्त्यांवर फिरताना यांची लोकांना गरज पडते), इ. इथे विकायला येतं.
जवळपासच्या आणखीही काही खेड्यांत असे आठवडी बाजार आहेत पण आमाबेडाचा ‘हाट’ सगळ्यात जुना आहे, मला भेटलेल्या अनेक वृद्ध बाया-पुरुषांनी आपल्या लहानपणापासून तो पाहिलेला आहे. पण पूर्वीच्या बाजारात देवाणघेवाण पद्धतीनेच व्यवहार होत – उदा. तांदूळ देऊन मीठ घेतलं, या प्रकारचे. आता मात्र मजुरी किंवा इतर कामातनं मिळालेले पैसेच या हातातून त्या हातात जातात.
“मी लहान असताना, साधारण आठेक वर्षांचा, माझ्या काकांसोबत या बाजाराला येत असे,” ५३ वर्षांचे केशव सोरी सांगतात, ते कांकेरच्या एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम करतात. “माझे काका अजुराम सोरी हाटकरा गावात बांबूच्या टोपल्या विणत असत. आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळीच निघत असू. वाटेत रात्रीचे थांबत असू आणि पुन्हा पहाटेचे निघत असू. त्याकाळी बहुतेक व्यवहार वस्तूंच्या देवाणघेवाणीतूनच होत असत, पैशांचा वापर फारच थोडे लोक करीत. माझे काका सुद्धा तांदूळ आणि इतर गरजेच्या वस्तूंच्या बदल्यात टोपल्या विकत.”
आमाबेडाचा ‘हाट’ कांकेरपासून सुमारे ३५ किमीवर आहे. हा सगळा जंगलाचा भाग आहे, रस्ते आणि दळणवळण दोन्ही चांगलं नाही. इथे बससेवा नाही, फक्त ठासून भरलेल्या बोलेरो टॅक्सी किंवा टेम्पोच काय ते फेऱ्या करतात. त्यात पुन्हा नक्षली आणि शासन यांच्यातील हिंसाचाराचाही प्रभाव दिसतो. पोलीस नियमितपणे वाहने तपासतात, आमचीही गाडी त्यांनी तपासली आणि आम्ही कुठून आलो, बाजारात का चाललोय अशा चौकशाही केल्या.
आमाबेडाला माध्यान्हीला पोचलो, जेव्हा बाजारातील खरेदी-विक्री जोरात सुरु असते; म्हणजे दुपारी १ ते ३ च्या दरम्यान. त्यानंतर लोक हळूहळू परतायला लागतात. त्यातही आम्ही एक कोंबड्यांची झुंज बघू शकलो. ‘मुर्गा लडाई’ हा एक लोकप्रिय खेळ आहे आणि देशातील अनेक भागातील आदिवासी बाजारातील करमणुकीचा खेळ आहे. छत्तिसगड, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि झारखंड या राज्यांत मी हा खेळ पहिला आहे. या गावकऱ्यांत झुंजीचा कोंबडा बाळगणे आणि लढाई जिंकणे ही मोठी मानाची बाब मानली जाते.
आमाबेडामध्ये, जवळ-जवळ २०० जण जमलेले आहेत. त्यांत स्त्रिया मुळीच नाहीत आणि साधारण ५० जणांजवळ कोंबडे आहेत. उरलेले सगळे बघे आहेत जे झुंजीवर आपापसात पैजा लावतात. या पैजा १०० रुपयांच्या घरात असतात पण ५००० पर्यंतही जाऊ शकतात (असं ते सांगतात). ५-१० मिनिटांची एक अशा साधारण २०-२५ झुंजी खेळवल्या जातात. दोघांपैकी एक कोंबडा गंभीरपणे जखमी होईपर्यंत किंवा मरेपर्यंत झुंज चालते. जिंकणाऱ्या कोंबड्याच्या मालकाला हरलेला जखमी किंवा मेलेला कोंबडा मिळतो, अर्थात त्याच्या घरी त्यादिवशी खास बेत असतो! झुंजीच्या वेळेचा आरडाओरडा/आरोळ्या एखाद्या कुस्तीच्या आखाड्यासारख्याच असतात.
अनुवादः छाया देव