त्या रात्री डोंगराचा अख्खा कडाच खाली कोसळला.
रात्रीचे ११ वाजले होते. अंकिता बाकडे झोपल्या होत्या. त्यांच्या १७ जणांच्या एकत्र कुटुंबाची शेजारीच ४-५ घरं आहेत. सगळे जण झोपी गेलेले होते. “जोरात काही तरी कोसळल्याचा आवाज आला आणि आम्हाला जाग आली. काय झालं ते लगेचच आमच्या लक्षात आलं,” त्या सांगतात. “आम्ही अंधारातच घराबाहेर पळ काढला. तोपर्यंत आमच्या शेजारची घरं पडली होती.”
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात, सह्याद्रीच्या रांगामधलं मिरगाव हे अंकितांचं गाव. त्या दिवशी डोंगर खचला त्यात त्यांचं घर वाचलं पण त्यांच्या एकत्र कुटुंबातले ११ जण २२ जुलैच्या रात्री गतप्राण झाले. गेलेल्यांमधला सगळ्यात लहान युवराज सात वर्षांचा होता आणि यशोदा बाकडे ८० वर्षांच्या.
दुसऱ्या दिवशी आपत्ती सुरक्षा दलाचे लोक त्यांची सुटका करण्यासाठी आले. दुपारपर्यंत अनिता आणि त्यांच्या गावातल्या इतरांना इथून सहा किलोमीटरवर असलेल्या कोयनानगरच्या जिल्हा परिषद शाळेत हलवण्यात आलं होतं. कोयना धरण आणि जलविद्युत प्रकल्पापासून मिरगाव फक्त पाच किलोमीटर लांब आहे.
“आम्ही [२२ जुलै रोजी] एक छोटी दरड कोसळल्यावर लगेच संध्याकाळी ७ वाजल्यानंतर लोकांना इथून बाहेर काढायला सुरुवात केली होती. आम्हाला वाटलं नव्हतं अजून काही घडेल. रात्री ११ वाजता हा भयानक प्रकार घडला आणि काही क्षणांच्या आत आमचं अख्खं गाव उद्ध्वस्त झालं,” गावचे पोलिस पाटील सुनील शेलार सांगतात.
मिरगावच्या २८५ लोकांसाठी (जनगणना, २०११) मुसळधार पाऊस आणि छोट्या मोठ्या दरडी काही नव्या नाहीत. यातल्या ११ जणांचा या दरडींनी बळी घेतला. २२ जुलैला जे काही घडलं तसं आधी कधीही झालं नव्हतं. त्या दिवशी कोयना धरण क्षेत्रात ७४६ मिमी पाऊस झाल्याचं बातम्यांमधून कळतं. त्या आठवड्यात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मोठे पूर आले.
“२१ जुलैच्या रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली,” ४५ वर्षीय जयश्री सपकाळ सांगतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत माझी त्यांची भेट झाली. “आम्हाला फार काही चिंता वाटत नव्हती कारण या काळात नेहमीच जोराचा पाऊस येतो. पण रात्री ११ वाजता प्रचंड मोठा आवाज झाला आणि आमची झोप उडाली. काही मिनिटात आमच्या गावावर डोंगर कोसळला. आम्ही पळत शेजारच्या देवळात जाऊ शकलो हे आमचं नशीब.”
“गावातली काही माणसं पळत पळत आमच्या घरी आली आणि म्हणाली की डोंगर कोसळलाय म्हणून,” २१ वर्षांची कोमल सुतार सांगते. “आम्ही सेकंदभर विचार केला नाही आणि घर सोडलं. वीज नव्हती त्यामुळे आम्हाला काहीच दिसेनासं झालं होतं. आम्ही चिखल आणि कंबरभर पाण्यातून वाट काढत कसंबसं देवळात पोचलो. रात्रभर आम्ही तिथेच होतो.”
घरांचं नुकसान झालं, जीवितहानी झालीच पण पाऊस आणि दरडींमुळे शेती आणि पिकांचंही नुकसान झालं. “काही दिवसांपूर्वीच मी भातलावणी केली होती, यंदा पिकं चांगली येतील असं वाटलं होतं,” ४६ वर्षीय रवींद्र सपकाळ सांगतात. त्यांच्या एकत्र कुटुंबाची १२ घरं पडली. “माझी सगळी शेती वाहून गेली. सगळीकडे फक्त चिखल आहे. आता काय करायचं तेच कळत नाहीये. आमचं सगळं कुटुंब भातपिकावरच अवलंबून होतं.”
मिरगावचे वयोवृद्ध रहिवासी घर सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत मुक्कामाला गेले. घर सोडून दुसरीकडे जाण्याची ही त्यांची तिसरी वेळ. पहिलं विस्थापन साठीच्या दशकात कोयना धरण बांधलं गेलं तेव्हा. मूळचं मिरगाव धरणात बुडालं त्यामुळे लोक डोंगरात उंचावर रहायला गेले. त्यानंतर ११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना परिसरात मोठा भूकंप झाला आणि आसपासच्या गावातल्या लोकांना मदत शिबिरात हलवण्यात आलं होतं. ‘नव्या’ मिरगावातल्या लोकांनाही. आणि त्यानंतर त्यांना ज्या जागी पुनर्वसित करण्यात आलं तिथेच २२ जुलै रोजी दरड कोसळली.
“धरण बांधलं तेव्हा सरकारने आम्हाला शेतजमीन देऊ, नोकऱ्या देऊ असा शब्द दिला होता,” ४२ वर्षीय उत्तम शेलार सांगतात. “४० वर्षं होऊन गेली पण आम्हाला काहीही मिळालेलं नाही. तुम्ही कोयनेच्या परिसरात जाऊन बघा. डोंगराला भेगा पडल्या आहेत. पुढच्या पावसाळ्यात हे सगळे डोंगर खाली येणार. आमच्या डोक्यावर टांगती तलवारच आहे.”
२३ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यभरात विविध ठिकाणी दरडींमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना ५ लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केल्याच्या बातम्या आहेत. अनिता बाकडेंच्या कुटुंबाला ही रक्कम मिळाली आहे. केंद्र शासनाने देखील २ लाखांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे, ती रक्कम अजून त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
पण दरडी कोसळल्यामुळे ज्यांच्या शेतजमिनी किंवा पिकं गेली आहेत त्यांच्यासाठी मदतीच्या कोणत्याही पॅकेजची घोषणा मात्र अजून करण्यात आलेली नाही.
“महसूल खात्याच्या लोकांनी आमच्याकडून एक फॉर्म भरून घेतलाय [भरपाईसाठी, २ ऑगस्ट रोजी] पण आतापर्यंत कसलीही घोषणा केलेली नाही,” २५ वर्षांचा गणेश शेलार सांगतो. त्याच्या शेतात पूर्ण चिखल भरलाय. गणेश मेकॅनिकल इंजिनियर आहे. कोविड-१९ ची महासाथ आली त्यानंतर त्याने नवी मुंबईतला त्याची नोकरी सोडली आणि तो गावी आपल्या कुटुंबाला भातशेतीसाठी मदत करायला परत आला. बोलता बोलत तो मध्येच थांबला. डोळ्यात येणारं पाणी थांबवायचा प्रयत्न करत तो म्हणतो, “आमची १० एकर शेती वाहून गेलीये, सगळंच्या सगळं पीक गेलंय. सरकारकडून आम्हाला काहीही मदत मिळेल याबद्दल मला शंकाच आहे.”
दरम्यान, दरड कोसळून कित्येक आठवडे उलटलेत. या संकटातून बचावलेले मिरगावचे रहिवासी अजूनही जिल्हा परिषदेच्या शाळेच मुक्कामाला आहेत. शासनाकडून आणि विविध सामाजिक संस्थांकडून मिळणाऱ्या धान्याच्या आणि इतर मदत साहित्याच्या आधारावर दिवस कंठत आहेत. आणि आता या सगळ्यांनाच व्यवस्थित आणि स्थायी स्वरुपाचं पुनर्वसन अपेक्षित आहे. “आमचं गाव तर गेलं. आता आमची एकच मागणी आहे ती म्हणजे आम्हाला सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं,” पोलिस पाटील सुनील शेलार सांगतात.
“कोणालाच [मिरगावातल्या] आपल्या घरी परत जायचं नाहीये. आम्हाला आता या परिसरात रहायचंच नाहीये. आमचं संपूर्ण पुनर्वसन व्हावं,” उत्तम शेलार सांगतात.
अनिताचे मावसभाऊ संजय बाकडे या दरडीतून बचावलेत. ते म्हणतात, “सरकारने आम्हाला स्वातंत्र्यदिनापर्यंत तात्पुरती घरं देण्याचं वचन दिलं होतं. पण त्यांनी ते पाळलेलं नाही. आम्ही असं या शाळेत किती दिवस राहणार?” शाळेत महिलांसाठी पुरेशी शौचालयं नाहीत, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. “दुसऱ्या जिल्ह्यात म्हटलात तरी आम्ही जायला तयार आहोत,” ते म्हणतात, “पण आता आमचं संपूर्ण पुनर्वसन व्हावं.”
१४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ च्या सुमारास शाळेत राहणारे सगळे रहिवासी बाहेर जमा झाले. दरडीमध्ये मरण आलेल्या मिरगावच्या ११ जणांची नावं त्यांनी पुकारली आणि काही क्षण ते निःशब्द उभे राहिले. सगळ्यांचे डोळे मिटलेले होते. फक्त अनिताताईंचे सताड उघडे. आपल्या कुटुंबातली ११ माणसं गेली या धक्क्यातून त्या अजूनही सावरलेल्या नाहीत.
त्यादेखील आपले पती आणि मुलासोबत अजूनही शाळेत राहतायत. हे दोघंही शेती करतात. काही नातेवाइकांसोबत जमिनीवर एका कोपऱ्यात बसलेल्या अनिताताई म्हणतात, “आमचं कुटुंब गेलं, घर गेलं, सगळं काही गेलं. आता काही आम्ही गावी परत जाणार नाही,” त्यांचा गळा भरून येतो आणि पुढचं बोलणं तसंच विरून जातं.