माझा जन्म संयुक्त कालाहांडी जिल्ह्यातला, जिथे दुष्काळ, उपासमारीने होणारे मृत्यू, नाईलाजाने केलेली स्थलांतरं हे सगळं काही लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. मोठं होत असताना आणि त्यानंतर एक पत्रकार म्हणून मी हे सगळं अगदी जवळून, बारकाईने पाहत होतो. त्यामुळे लोक स्थलांतर का करतात, कोण स्थलांतर करतं, कोणत्या परिस्थितीत लोक हा निर्णय घेतात, पोट भरण्यासाठी ते काय काय करतात – आणि जीव तोडून, शरीराला झेपणार नाही इतके काबाड कष्ट ते कसे काढतात, हेही.
यासोबत हेही ‘नॉर्मल’ होतं की जेव्हा त्यांना सरकारी मदतीची निकड असायची, तेव्हाच त्यांना वाऱ्यावर सोडलं जायचं. अन्न-पाण्याशिवाय, प्रवासाची कोणतीही साधनं नसताना, शेकडो किलोमीटर चालत दूरवरच्या गावांना पोचणाऱ्या यांच्यातल्या अनेकांच्या पायात चपला देखील नसायच्या.
या इथल्या सगळ्या लोकांशी माझी नाळ जुळलीये, इतकी, की वाटतं मी जणू त्यांच्यातलाच एक आहे – आणि त्यामुळे मला त्रास होतो. माझ्यासाठी ही सगळी माझीच माणसं आहेत. आणि म्हणूनच जेव्हा परत परत हीच माणसं, हेच समुदाय भरडले जाताना पाहिले तेव्हा मी प्रचंड अस्वस्थ झालो, हतबल झालो. आणि म्हणूनच मलाही प्रेरणा मिळाली – मी काही कवी नसलो तरी हे शब्द, हे काव्य बाहेर पडलं.




