हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.

अचानक तुमच्या एकरभर रानातली ज्वारी गायब होते तरी कशी आणि का? “गेल्या दोन वर्षांत मी पहिल्यांदाच रानात पीक असताना आठवडाभर गावाबाहेर गेलो असेन. तेवढ्या काळात त्यांनी सगळा नाश केला,” आनंदा साळवी सांगतात. ‘ते’ म्हणजे गव्यांचा कळप – जगातला अस्तित्वात असलेला सगळ्यात मोठा गोवंशीय प्राणी. नर गव्याची उंची खांद्यालाच ६ फुटाहून जास्त असू शकते आणि वजन ५०० ते १००० किलोदरम्यान कितीही.

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी अभयारण्यात सुखाने नांदणारे हे गवे आता महामार्गांवर येऊ लागले आहेत आणि जवळची शेतात धुडगूस घालू लागले आहेत.

“माझं शेत राखायला कुणीच नव्हतं,” राक्षी गावाचे साळवी सांगतात. “मी माझा एकरभर ऊस (सुमारे ८० टन) वाचवू शकलो हे नशीब.” हजार किलो वजनी गटाचा हा ताफा चालून आल्यावर तुम्ही काहीही कसं काय वाचवणार? फटाके फोडून.

गेल्या दोन वर्षांपासून साळवींनी रात्री रानात जागलीला जायला सुरुवात केली आहे. “आम्ही रोज रात्री ८ वाजता रानात येतो आणि पहाटे ४ च्या सुमारास सगळे गवे गेल्यावरच गावात परततो,” ते सांगतात. “आणि रात्रीही आम्ही रानात फटाके फोडतो.” फटाक्यांच्या भीतीने गवे त्यांच्या पाच एकर रानात शिरत नाहीत. त्यांचे अनेक शेजारीही हीच युक्ती वापरतायत. गेल्या किमान दोन वर्षांपासून पन्हाळा तालुक्यातल्या राक्षीत गव्यांनी पिकं फस्त केली आहेत.

PHOTO • Sanket Jain

अभयारण्यातल्या पक्षी आणि प्राण्यांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे दिवसेंदिवस आटत चाललेला सावराई सड्यावरचा तलाव. (फोटोः संकेत जैन/पारी)

“रानात पिकं असली की आम्हाला तसले फटाके खरेदी कराया दिवसाला ५० रुपये खर्चावे लागतात,” साळवींच्या पत्नी सुनीता सांगतात. शेतीसाठी येणाऱ्या खर्चाची हा एक अनोखाच पैलू. “रातीचं रानात झोपाया जायचं म्हटल्यावर,” त्या म्हणतात, “धोका आहेच की.” रात्रीच्या वेळी रानात इतर वन्यजीव जागे असतातच. सापांचंच घ्या.

लोकांना माहित आहे की थोड्याच काळात फटाक्यांनी फार काही इजा होत नाही हे गव्यांना कळून चुकेल. त्यामुळे राधानगरीतल्या काही शेतकऱ्यांनी कुंपणात विजेचा प्रवाह सोडायला सुरुवात केली आहे. “अहो, त्यांना त्याचीही सवय झालीये,” राधानगरीत काम करणाऱ्या बायसन नेचर क्लब या वन्यजीव संस्थेचे सह-संस्थापक सम्राट केरकर सांगतात. “गवे आपलं खूर किंवा पाय हळूच कुंपणावर ठेवून झटका बसतोय का त्याचा अंदाज घेताना आम्ही पाहिलंय. पूर्वी त्यांना माणसाची भीती वाटायची, पण आजकाल ते आम्हाला पाहून लागलीच पळून जात नाहीत.”

“आता गव्याचा तरी काय दोष आहे,” सुनीता म्हणतात. “सगळी चूक वनविभागाची आहे. जंगलं नीट राखली नाहीत तर जनावरं बाहेर येणारच की.”

आजकाल जंगलातून गवे बाहेर येण्याचं प्रमाण वाढत चाललंय – खाण्याच्या आणि पाण्याच्या शोधात. बाकी खाण्यासोबत त्यांना हवी असतात कारवीची पानं जी सुकत चाललेल्या जंगलांमध्ये आता पुरेशी मिळत नाहीत. आणि अभयारण्यातले पाणवठे सुकायला लागल्यामुळे पाण्याचाही शोध घेत ते बाहेर येतात. तसंच, वनरक्षक आणि अभ्यासकांचं असंही म्हणणं आहे की अभयारण्यातली कुरणं कमी झाल्यामुळेही त्यांना बाहेर पडण्यावाचून पर्याय नाही.

Anand Salvi lost an acre of jowar to a bison raid.
PHOTO • Sanket Jain
Sunita Salvi says she blames the forest department.
PHOTO • Sanket Jain
Metallic cots farmers sleep on in the fields, through the night.
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः आनंदा साळवींची एकरभर ज्वारी गव्यांनी फस्त केली. मध्येः सुनीता साळवी म्हणतात की सगळा दोष वनविभागाचा आहे. उजवीकडेः रात्री खुल्या आभाळाखाली, रानाची राखण करत शेतकरी लोखंडी खाटांवर झोपतात. (फोटोः संकेत जैन/पारी)

केंद्रीय भूजल बोर्डाच्या आकडेवारीनुसार राधानगरी तालुक्यात २००४ साली ३,५१० मिमि, २००८ साली ३,६८४ मिमि आणि २०१२ साली केवळ २,१२० मिमि पाऊस झाला – अचानक मोठी घट. गेल्या दहा वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातला पाऊस जास्तीत जास्त लहरी झाला आहे – महाराष्ट्राच्या इतर भागातही हेच चित्र आहे.

पन्नास वर्षांचे मेंढपाळ राजू पाटील यांनी दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा देवगड-निपाणी रस्त्यावर १२ गव्यांचा कळप पाहिला होता. त्यांच्या गावाच्या, राधानगरीच्या वेशीवर अभयारण्य आहे हे त्यांना ऐकून माहित होतं. पण त्यांनी गवा पाहिला नव्हता.

“गेल्या दहा वर्षांतच मी त्यांना जंगलाच्या बाहेर आलेलं पाहिलंय,” ते सांगतात. तेव्हापासून राधानगरी गावाच्या रहिवाशांना हे महाकाय प्राणी जंगलाबाहेर रस्ता पार करताना दिसणं सवयीचं झालं आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या मोबाइल फोनवर या प्राण्यांचे व्हिडिओही काढलेत. आजकाल गवे कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी, शाहूवाडी, करवीर आणि पन्हाळा तालुक्यातल्या शेतात शिरून ऊस, शाळू, मका आणि भाताची पिकं खाण्यासाठी जंगलातून शेतात येऊ लागले आहेत.

आणि पाणी पिण्यासाठीदेखील – कारण जंगलात पाण्याचं दुर्भिक्ष्य वाढू लागलं आहे.

राधानगरी तालुक्यातल्या लोकांचं ठाम म्हणणं आहे की गेल्या १०-१५ वर्षातच गवे जंगलाच्या बाहेर यायला लागले आहेत. पन्हाळ्यात मात्र हे अगदी अलिकडेच घडू लागलं आहे. जंगलाच्या जवळच शेत असणारे राक्षीचे ४२ वर्षीय युवराज निरुखे सांगतात, “आम्ही गेल्या दोन वर्षांतच गवा पाहिलाय. पूर्वी रानडुकरं पिकात यायची.” जानेवारीपासून त्यांच्या पाऊण एकर रानात १२ गव्यांचा कळप तीनदा घुसलाय. “माझी चार क्विंटल शाळू गेली. आता तर मला पावसाळ्यात भात लावायची पण भीती वाटायला लागलीये,” ते म्हणतात.

राधानगरी तालुक्यातल्या रहिवाशांनी त्यांच्या मोबाइल फोनवर जंगलातून बाहेर येऊन गवे रस्ते आणि महामार्ग पार करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढलेत

“हवामानाचं चक्र पूर्णपणे बिघडून गेलंय,” राधानगरीचे वनक्षेत्रपाल प्रशांत तेंडुलकर म्हणतात. “पूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यात एकदा तरी पाऊस पडायचा, ज्यामुळे पाणवठे भरायचे. आपणच निसर्गाच्या विरोधात चाललोय, तर दोष तरी कुणाला द्यायचा? सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी कसं होतं, जंगल, मग गायरान, शिवार आणि मग गाव. आता या सगळ्या जागांवर लोकांची वस्ती व्हायला लागली आहे आणि जंगलाकडे सरकत चालली आहे. जंगल आणि गावातल्या जागेवर अतिक्रमण व्हायला लागलंय.”

एक ‘अतिक्रमण’ तर अतिशय घातक स्वरुपाचं आहे – बॉक्साइटच्या खाणी. गेल्या दहा वर्षात खाणकामाचं चालू-बंद सुरूच आहे.

“गेल्या अनेक वर्षांच्या काळात बॉक्साइटच्या खुल्या खाणींमुळे राधानगरीची पार दुर्दशा झालीये,” सँक्च्युअरी एशियाचे संपादक बिट्टू सेहगल सांगतात. “खाणींना खूप विरोध झाला पण इंडाल [कालांतराने हिंडाल्कोमध्ये विलीन] सारख्या खाण कंपन्यांचे आंदोलकांच्या तुलनेत सत्ताधाऱ्यांशी जास्त लागेबांधे होते. या कंपन्या सरकारी कचेऱ्यांमध्ये बसून धोरणं लिहीत होत्या. गायरानं, पाण्याचे स्रोत, सगळ्याचाच या खाणकामामुळे प्रचंड ऱ्हास झाला आहे.”

खरोखरच, १९९८ पासून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने या खाणकामाबद्दल अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अगदी नुकतंच म्हणजे ऑक्टोबर २०१८ मध्ये राज्याने या मुद्द्याबाबत ‘संपूर्ण अनास्था’ दाखवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

PHOTO • Sanket Jain

वरती डावीकडेः युवराज निरुखेंना या हंगामात भात लावायचीही भीती वाटते आहे. उजवीकडेः राजू पाटील यांचा पाऊण एकरातला ऊस गव्यांनी फस्त केला. खालीः मारुती निकम यांच्या अर्ध्या एकरातलं हत्ती गवत गव्यांनी खाऊन टाकलं. (फोटोः संकेत जैन/पारी)

२०१२ साली कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासातून खाणकामाचे दूरगामी परिणाम पुढे आले. त्यांचा शोधनिबंध , बॉक्साइट खाणकामाचा कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरणार होणारा परिणाम असं दाखवतो की “­अधिकृत आणि अनधिकृत खाणकामामुळे या प्रदेशात पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे. सुरुवातीला खाणींमुळे मोजक्या स्थानिक रहिवाशांना रोजगार मिळाला आणि सरकारलाही महसूल प्राप्त झाला पण हा लाभ थोडा काळच टिकणार आहे. मात्र जमिनीच्या अशा प्रकारच्या वापरामुळे स्थानिक परिस्थितिकीचं जे नुकसान झालं आहे ते भरून काढता येणार नाही.”

राधानगरीपासून फक्त २४ किलोमीटरवर आणखी एक अभयारण्य आहे – दाजीपूर. १९८०च्या दशकापर्यंत दोन्ही मिळून एकच अभयारण्य होतं मात्र त्यानंतर दोन वेगळे भाग करण्यात आले. दोन्ही अभयारण्यांचं मिळून क्षेत्रफळ ३५१.१६ चौ. कि.मी. इतकं आहे. दाजीपूरमधला सावराई सडा, ज्यामध्ये एक तलावही आहे, इथल्या पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न आणि पाण्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र या वर्षी मे महिन्यात तलावाचा बहुतेक भाग सुकून गेला होता.

सोबत, ­“बहुतेक जंगलतोड गेल्या दहा वर्षांत झाली आहे. त्याचा परिणाम सगळ्या [वातावरणाच्या] चक्रावर झाला आहे,” वन्यजीव संरक्षण व संशोधन संस्थेचे अध्यक्ष आणि वन्यजीव संशोधक अमित सय्यद सांगतात.

वन खात्याने प्राण्यांसाठी काही ठिकाणी कृत्रिम ‘मिठाच्या चाटण जागा’ तयार केल्या आहेत. या अशा जागा असतात जिथे प्राण्यांना आवश्यक क्षार आणि पोषक तत्त्वं मिळू शकतात. दाजीपूर आणि राधानगरीमध्ये काही ठिकाणी मीठ आणि कोंडा जमा करून ठेवलेला आहे.

या प्रदेशात मानवाने आणखी एक प्रकारचा हस्तक्षेप केला आहे, मात्र तो काही फारसा भला नाहीः ऊसाची वाढती लागवड. कोल्हापूरचा भाग, इथल्या काही तालुक्यातल्या दमदार पावसामुळे कित्येक वर्षं उसासाठी साजेसा होता. मात्र उसाच्या लागवडीत होणारी वाढ मात्र भीतीदायक आहे. राज्य साखर आयुक्तालय आणि गॅझेटमधल्या आकडेवारीनुसार १९७१-७२ साली कोल्हापुरात ४०,००० हेक्टरवर उसाची लागवड होत होती. गेल्या वर्षी, २०१८-१९ मध्ये हाच आकडा १,५५,००० इतका म्हणजे तब्ब्ल २८७ टक्क्यांनी वाढला आहे. (महाराष्ट्रात एकरभर ऊस पिकवायला १ कोटी ८० लाख लिटर ते दोन कोटी लिटर पाणी लागतं.)

PHOTO • Sanket Jain

वरती डावीकडेः कळपापासून अलग झालेला एक गवा. उजवीकडेः सडा आणि कमी होत चाललेलं जंगल. खाली डावीकडेः सावराई सड्यावर प्राण्यांसाठी क्षारांचं चाटण म्हणून ठेवलेलं मीठ आणि कोंडा. उजवीकडेः अभयारण्याच्या जवळच असलेला उसाचा फड. (फोटोः संकेत जैन/पारी)

या सगळ्या प्रक्रियांचे जमीन, पाणी, जंगल, झाडझाडोरा, पशुपक्षी, हवामान आणि वातावरणावर अमिट असे परिणाम झाले आहेत. या अभयारण्यातली वनं दक्षिणी निम सदाहरित, दक्षिणीय आर्द्र मिश्र पानगळीची आणि दक्षिणीय सदाहरित अशा प्रकारची आहेत. या सगळ्या बदलांचे परिणाम अभयारण्यांपुरते मर्यादित नसले तरी त्यांचा फार खोल परिणाम इथल्या वनांमधल्या प्राण्यांवर झाला आहे. मानवी हालचाल वाढतीये, गव्यांचे कळप मात्र जैसे थे आहेत.

काही दशकांपूर्वी इथे १,००० हून अधिक गवे होते असं मानलं जातं पण आज मात्र महाराष्ट्राच्या वन खात्याच्या माहितीनुसार राधानगरी अभयारण्यात ५०० गवे आहेत. वनक्षेत्रपाल प्रशांत तेंडुलकर यांच्या अंदाजानुसार, ७००. भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अन्वये गवा पहिल्याअनुसूचीमध्ये आहे म्हणजेच त्याला संपूर्ण संरक्षण मिळणं गरजेचं आहे. या प्राण्यांना काही इजा-अपाय केल्यास जबरी शिक्षा होऊ शकते. निसर्ग संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेने जाहीर केलेल्या धोक्यात असणाऱ्या प्रजातींच्या ‘लाल यादी’ मध्ये गव्याचा समावेश आहे, त्यांचं वर्गीकरण ‘बिकट’ असं केलं गेलं आहे.

गवे एकीकडून दुसरीकडे चाललेत, मात्रः “त्यांच्याकडे [वन खातं] त्यांच्या स्थलांतराबद्दल कोणत्याही नोंदी/माहिती नाही,” अमित सय्यद सांगतात. “ते नक्की कुठे चाललेत? ते कोणत्या मार्गाने जातायत? त्यांचे कळप नक्की कसे आहेत? एका कळपात किती गवे आहेत? जर त्यांचं कळपांवर लक्ष असेल तर अशा गोष्टी घडणार नाहीत. तसंच, त्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर पाणवठे तयार करायला हवेत.”

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार जून २०१४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात त्या महिन्याच्या सरासरीपेक्षा ६४ टक्के कमी पाऊस झाला. २०१६ मध्ये उणे ३९ टक्के. २०१८ साली सरासरीपेक्षा १ टक्का जास्त. जुलै २०१४ मध्ये सरासरीपेक्षा ५ टक्के जास्त. आणि पुढच्याच वर्षी जुलै महिन्यात उणे ७६ टक्के. या वर्षी १ जून ते १० जुलै या काळात सरासरीपेक्षा २१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. मात्र, अनेकांच्या सांगण्याप्रमाणे, एप्रिल आणि मे महिन्यात वळवाचा किंवा मॉन्सूनपूर्व पाऊस काही झालेला नाही. “गेल्या दहा वर्षात पाऊस लहरी झाला आहे,” केरकर म्हणतात. यामुळे समस्येत भरच पडली आहे आणि जंगलांमध्ये बारमाही पाणीसाठे आता कमी कमी होत चालले आहेत.

PHOTO • Rohan Bhate ,  Sanket Jain

वरती डावीकडेः दाजीपूर अभयारण्यात (फोटोः संकेत जैन/पारी). उजवीकडेः गवा मादी आणि तिची पिल्लं (फोटोः रोहन भाटे). खाली डावीकडेः गव्यांसाठी नैसर्गिक तळ्याशेजारी कृत्रिम पाणवठा तयार केला जातोय. उजवीकडेः ३,००० लिटरच्या टँकरमधून तळ्यात पाणी सोडताना सम्राट केरकर. (फोटोः संकेत जैन/पारी)

एप्रिल आणि मे २०१७ मध्ये राधानगरी आणि दाजीपूरमधल्या पाणवठ्यांमध्ये पहिल्यांदा बाहेरुन पाणी भरावं लागलं – टँकरचं. दोन्ही जंगलांमधल्या तीन पाणवठ्यांसाठी केरकरांच्या बायसन नेचर क्लबच्या वतीने सुमारे २०,००० लिटर पाणी पुरवण्यात आलं. २०१८ साली हा आकडा २४,००० लिटरपर्यंत गेला. (जंगलातले अनेक पाणवठे वनविभागाच्या अखत्यारीत येतात आणि त्यांची व्यवस्था वन खातं स्वतः पाहतं).

मात्र “या वर्षी, वन खात्याने आम्हाला फक्त राधानगरीच्या एकाच पाणवठ्यासाठी पाणी पुरवायला सांगितलं, का ते माहित नाही,” केरकर सांगतात. या वर्षी या संस्थेने ५४,००० लिटर पाणी पुरवलं आहे. तसंही, “आम्ही जून महिन्यात पहिले एक दोन पाऊस झाले की पाणी पुरवठा थांबवतो,” केरकर सांगतात.

जंगलतोड, खाणकाम, पीकपद्धतीत मोठे बदल, दुष्काळ, एकूणच वाढलेली शुष्कता, पाण्याचा खालावलेला दर्जा, भूजलाचा बेसुमार उपसा – या सगळ्याचा राधानगरी आणि आसपासच्या प्रदेशाच्या जंगल, शेती, माती, हवामान आणि वातावरणावर परिणाम झाला आहे.

पण फक्त नैसर्गिक घटक ढासळत चालले आहेत असं मात्र नाही.

गवा-मानव संघर्ष वाढत चालला आहे. ­“माझ्या २० गुंठ्यात लावलेलं सगळं हत्ती गवत गव्याने खाऊन टाकलं,” पन्हाळा तालुक्यातल्या निकमवाडीचे ४० वर्षीय मारुती निकम सांगतात. त्यांचं सहा एकर रान आहे. “जानेवारी ते एप्रिल दरम्यान दुसऱ्या ३० गुंठ्यात लावलेली मकाही त्यांनी फस्त केली.”

“पावसाळ्यात जंगलात भरपूर पाणी असणार. पण तरीही त्यांना खायला काही मिळालं नाही की त्यांचा मोर्चा परत आमच्याच रानात येणार.”

शीर्षक छायाचित्रः रोहन भाटे. त्यांनी काढलेले फोटो वापरायची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आणि सँक्च्युअरी एशियाचे आभार

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Sanket Jain

Sanket Jain is a journalist based in Kolhapur, Maharashtra. He is a 2022 PARI Senior Fellow and a 2019 PARI Fellow.

Other stories by Sanket Jain

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Series Editors : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale