कृष्णनला जेव्हा ते पांढऱ्या नरम सालीचं गोड फळ सापडलं तेव्हा सगळेच उत्साहात आले. त्याने ते सोललं, आणि आतला गुलाबी-लाल गर दिसायला लागला. बारा वर्षांच्या आर. राजकुमारने एक घास घेतला तर त्याचे ओठही तसेच लाल झाले! म्हणूनच या मुलांनी त्याला थाप्पात्तीकल्ली म्हणजे लिपस्टिक फळ असं नाव दिलंय. मग इतरही मुलांनी फळाला चावे मारले आणि आपली तोंडं लाल करून घेतली. जंगलात मारलेली अशी फेरी नेहमीच एक आनंदवारी असते.
डिसेंबरमधल्या त्या सकाळी त्यांचे वाटाडे होते जी. मणिगंदन (३५) आणि के. कृष्णन (५०). चेरुक्कानुर गावाजवळच्या झुडुपांच्या त्या जंगलातून वेली बाजूला सारत किंवा पहारीने त्या उपटून काढत ते आत आत जात आहेत. त्यांच्या सोबतची पाच मुले – वय वर्षे दीड ते बारा – आणि ते दोघेही इरुला आदिवासी आहेत.
त्या रविवारी, ते काट्टु वेल्लीकिळंगु कंदाचा वेल शोधत होते. “ तो कंद तुम्ही फक्त विशिष्ट महिन्यांतच (डिसेंबर-जानेवारी) खाऊ शकता. तो अगदी कोवळा असावा लागतो, नाहीतर तो खाजतो,” मणीगंदन सांगतो, “आधी इतर झुडपांमधून त्या वेलीचं खोड ओळखावं लागतं. त्याच्या जाडीवरून आम्हाला कळतं की कंद किती मोठा असेल आणि तो पूर्ण खणून काढण्यासाठी किती खोल खणावं लागेल.” या कंदाचा शोध घेतानाच त्यांना लिपस्टिक फळ मिळालं होतं. (याला इकडे नाधेल्ली पळ्हम् असेही म्हणतात.)
काही मिनिटांच्या शोधानंतर त्यांना मनाजोगती काट्टु वेल्ली किळंगु वेल सापडते आणि ते तिचा कोवळा कंद खणून काढतात. सगळ्या प्रक्रियेचं निरीक्षण करणारी मुलं उत्सुकतेने त्याची साल सोलून त्याचे तुकडे खाऊ लागतात.
सकाळीच निघालेली मंडळी दुपारपर्यंत बंगालामेडूला परततात. तमिळनाडूच्या तिरुवल्लुर जिल्ह्याच्या तिरुत्तानी तालुक्यातील चेरुक्कानुर गावापासून ३ किमी अंतरावरील इरुला आदिवासींचा हा पाडा आहे.








