“लोकांच्या आवडी बदलल्यात, आम्ही नाही,” मंगला बनसोडे हताशपणे म्हणतात. आताशा लोकांना लोकप्रिय हिंदी गाणी हवी असतात, त्या सांगतात. “अहो, अशी पण वेळ येईल जेव्हा शिवाजी महाराजांच्या आगमना वेळीदेखील एखादं हिट गाणं वाजवावं लागेल!” त्या हसतात.
गेल्या पन्नास वर्षांच्या काळात प्रेक्षकांची आवड बदललेली त्यांनी पाहिलीच आहे, पण त्याचसोबत तमाशाचा कायापालट झालेलाही त्यांनी पाहिलाय. पूर्वीचे अंदाजे १० बाया अन् गडी घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावाला बैलगाडीने जाणारे फड आणि आता त्यांचाच एखाद्या प्रॉडक्शन हाउससारखा असणारा फड हे रुपांतर त्यांनी जवळून पाहिलंय.
मंगला बनसोडे सात वर्षांच्या असल्यापासून या व्यवसायात आहेत. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची थोरली मुलगी. तमाशाची पंढरी समजलं जाणाऱ्या नारायणगाव परिसरात विठाबाईंनी काम केलं. १९८३ पासून मंगलाताईंनी स्वतःचा फड चालवला. आता त्या सातारच्या करवडी गावी राहतात. त्यांच्या फडात एकूण १७० लोक आहेत. ‘मंगला बनसोडे आणि नीतीन कुमार तमाशा मंडळ’. नीतीन त्यांचा धाकटा मुलगा आणि या फडाचा गायक- नट-नर्तक आणि एकूणच स्टार. दर वर्षी सप्टेंबर ते मे या काळात मंगलाताईंच्या फडाचे महाराष्ट्रभर खेळ होतात.









