हल्ली सुखमती देवींचे पाय कापू लागले आहेत. पर्वतांमध्ये सतत चढउतार केल्याने हे उद्भवलं आहे. गेली अनेक दशकं ६५ वर्षांच्या, शेतकरी असणाऱ्या सुखमती अंदाजे ३,६०० मीटर उंचीवरच्या आपल्या कुती या गावी ७० किमी चढण पायी चढून गेल्या आहेत. मे ते नोव्हेंबर या काळात त्या कुतीतल्या घरी राहतात. आणि जेव्हा गावात सगळीकडे बर्फ पसरतं तेव्हा त्या ७० किमी अंतर उतरून ९०० मीटर उंचीवर असणाऱ्या धारचुलाला येतात.
कधी कधी त्या घोडा करतात कारण काही ठिकाणी इतका उतार आहे की साडेतीन किलोमीटर अंतर उतरून येण्यासाठी तासंतास लागू शकतात. मात्र आता तो पर्यायही सोपा राहिलेला नाही कारण पावसाबरोबर वाहून आलेला मलबा आणि दगडधोंड्यांमुळे ही वाटही बंद झाली आहे. इथल्या गावांमधले लोक सांगतात की सीमा सडक संघटना (बीआरओ) लिपुलेख खिंडीत रस्ता बांधतीये आणि त्यासाठी पर्वतांमध्ये सुरुंगाचे स्फोट करते.
हा सगळा मलबा तुडवून जावं लागत असल्यामुळे सुखमतींची दर वर्षीची कुतीची वारी खडतर झालीये. वाटेत अनेक अवघड चढणी आहेत, काली, कुती-यांगती या नद्यांनी वाटा अडवल्या आहेत. “एक दिवस तरी चारचाकी गाडीने मी माझ्या गावी जाईन हीच आशा आहे,” २०१७ साली मे महिन्यात आम्ही कुतीचा ७० किलोमीटरचा प्रवास एकत्र केला तेव्हा त्या मला सांगत होत्या. हिमालयातल्या व्यास खोऱ्यातल्या ३६३ वस्ती असणाऱ्या त्यांच्या गावी पोचायला आम्हाला पाच दिवस लागले.
सुखमती देवी (शीर्षक छायाचित्रात) भारत-चीन सीमेवरच्या सात गावांतल्या २०५९ रहिवाशांपैकी एक, सगळे भोतिया या अनुसूचित जमातीचे लोक. या सर्वांसाठी २०१९ लोकसभेच्या निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा रस्ता. गेली अनेक वर्षं प्रत्येक निवडणुकीत, राज्याच्या किंवा स्थानिक त्यांच्या अनेक मागण्यांपैकी ही एक मागणी राहिली आहे. ही गावं ११ एप्रिल रोजी मतदान करतील.










