या वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पद्माबाईंच्या जमिनीचं मूल्यांकन केलं – एकरी १३ लाख, म्हणजेच सहा एकरासाठी ७८ लाख रुपये. हा आकडा कुणालाही आकर्षक वाटेल पण त्यांच्यासाठी हा केवळ पैशाचा कोरडा व्यवहार नाहीये. “मी माझ्या पोरींची लग्नं करून दिली, माझ्या पोरांना शिकविलं, माझ्या सासूला मी सांभाळतीये, घर बांधलं – सगळं या रानात काम करूनच केलं ना,” त्या संतापाने म्हणतात. “या जमिनीने आमचं घर एकत्र बांधून ठेवलंय. ही जमीनच गेली तर पुढे आशा धरायला माझ्यापाशी काय राहील? आमची जमीन म्हणजे आमची ओळख आहे.”
पद्माबाईंचा धाकटा मुलगा १८ वर्षांचा आहे आणि विज्ञान शाखेत शिकतोय, थोरला २० वर्षांचा आहे. दोघंही रानात काम करतात. “आजकालच्या जमान्यात नोकरी भेटणं किती मुश्किल आहे हे ते काय आम्हाला माहित नाही,” त्या म्हणतात. “त्यांना जर का कुठे नोकरी नाही भेटली तर मग शहरात बिगारी म्हणून नाही तर वॉचमन म्हणून काम करावं लागेल. तुमची स्वतःची जमीन असेल तर तुम्हाला काही तरी आधार राहतो ना.”
१,२५० वस्तीच्या हाडस पिंपळगावमध्ये गाजरे कुटुंबियांचं घर सध्याच्या मुंबई नागपूर महामार्गापासून फार काही लांब नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र नव्या समृद्धी महामार्गामुळे राज्याचं नशीब खुलणार आहे अशा पद्धतीने त्याचं समर्थन करत आहेत. आठ मार्गिका, १२० मीटर रुंद आणि ७१० किलोमीटर लांब असणाऱ्या या महामार्गामुळे अर्थकारणाला गती मिळेल, शेतातला माल सत्वर बंदरांपर्यंत आणि शेती प्रक्रिया केंद्रांपर्यंत पोचेल असा त्यांचा दावा आहे. या प्रकल्पाला ४६,००० कोटी रुपये इतका खर्च येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.