१ मे. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गोंदियातल्या महिला कामगारांच्या सन्मानार्थ आज आम्ही हा लेख पुनःप्रकाशित करत आहोत. २७ जानेवारी २००७ रोजी पहिल्यांदा द हिंदूमध्ये प्रकाशितझालेल्या या लेखातल्या स्त्रियांची परिस्थिती आजही फारशी सुधारलेली नाही.
रेवंताबाई कांबळे किती तरी महिने झाले तिच्या सहा वर्षाच्या लेकाशी बोललीच नाहीये. ते दोघंही तिरोड्याला एकाच घरात राहतात. बुरीबाई नागपुरेंचीही तीच गत आहे. त्या किमान त्यांच्या मोठ्या मुलाला जागेपणी कधी तरी पाहतात तरी. महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात या दोघींसारख्या अशा शेकडो स्त्रिया आहेत ज्या स्वतःच्या घरी दिवसातले फक्त चार तास असतात आणि दिवसाला ३० रुपयांचा रोजगार कमवण्यासाठी दर आठवड्याला १,००० किलोमीटरहून जास्त प्रवास करतात.
सकाळचे ६ वाजलेत. आम्ही या बायांसोबत त्यांच्या घरून रेल्वे स्टेशनवर येतो. त्या आधी दोन तास सगळ्या जणी जाग्या झाल्या होत्या. “स्वयंपाक, धुणी भांडी, सगळं उरकलंय,” बुरीबाई खुशीत सांगतात. “आता बोला.” आम्ही आलो तेव्हा त्यांच्या घरचं कुणीही जागं नव्हतं. “बिचारी थकून गेलीयेत,” बुरीबाई म्हणतात. पण बुरीबाई स्वतः दमल्या नाहीयेत का? “होय. पण करणार काय? दुसरा काहीच मार्ग नाही ना.”
स्टेशनवर अशा ‘दुसरा काहीच मार्ग नसलेल्या’ अनेक जणी होत्या. त्यांचं वेगळेपण म्हणजे, त्या काही गावातून शहरात येणाऱ्या कामगार नाहीत. त्या शहरातल्या अशा मिळेल ते काम करणाऱ्या, गावात रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या कामगार आहेत. आणि मग अशाच शोधात त्या तिरोड्यासारख्या तालुक्याच्या गावाहून दररोज आसपासच्या गावात जाऊन, तिथे शेतात राबतात. दररोज २० तास घरापासून लांब. साप्ताहिक सुट्टी वगैरे नसतेच आणि तिरोऱ्यात तर काही कामं पण नाहीयेत. “विडी उद्योग बंद झाला, आणि तेव्हापासून त्यांना काम मिळणं दुरापास्त झालंय,” गोंदियाचे किसान सभेचे जिल्हा सचिव महेंद्र वाल्दे सांगतात.








