पुणे जिल्ह्यातल्या मलठणच्या चिमाबाई दिंडलेंना जात्यावरच्या ओव्या संग्रहासाठी गायलेल्या ओव्या आता बिलकुल आठवत नाहीत. मात्र पारीच्या ‘जात्यावरच्या ओव्या टीम’ने गळ घातल्यावर त्यांनी काही ओव्या सांगितल्या, प्रेमळ नवऱ्याच्या, गोसाव्याच्या आणि ईश्वरासमान जात्याच्या.
“आता गावात कुणी लग्नं करतंय का? आणि जात्यावर कोण हळदी दळतंय आता?” चिमाबाई दिंडले आम्हाला सवाल करतात. आता त्या ओव्याच गात नाहीत त्यामुळे पूर्वी गायलेल्या ओव्यांचं त्यांना बिलकुल ध्यान नाही असं त्या म्हणतात.
१९९४ साली मुळशी तालुक्यातल्या वडवली गावच्या चिमाबाई आणि इतरही अनेक कुटुंबांना दौंडमध्ये पुनर्वसित व्हायला लागलं होतं. मोसे नदीवर वरसगाव धरण बांधल्यामुळे हे सगळे जण विस्थापित झाले. जात्यावरच्या ओव्या संग्रहासाठी ओव्या गायलेल्या चिमाबाई आणि इतर ओवीकारांना भेटण्यासाठी २४ जुलै २०१७ रोजी आम्ही थेट दौंड गाठलं.
आमचा पहिला मुक्काम होता दापोडी गावी. तिथे आम्ही सरूबाई कडूंना भेटलो. त्यांच्या ओव्या पारीवरच्या दोन लेखांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. चिमाबाई कुठे भेटतील ते आम्हाला सरूबाईंनी सांगितलं. चिमाबाईंनी १९९० मध्ये जात्यावरच्या ओव्या गोळा करणाऱ्या मूळ टीमसाठी ५०० ओव्या गायल्या आहेत. तिथून आम्ही निघालो येवले वस्तीला, हा मलठण गावाची एक वस्ती. चिमाबाई आणि सरूबाई नणंदा-भावजया आहेत हे आम्हाला नंतर समजलं.
आम्ही जेव्हा चिमाबाईंच्या तीन खोल्यांच्या पत्र्याच्या घरी पोचलो तेव्हा त्या पत्र्याची कड धरून एका कोपऱ्यात बसलेल्या होत्या. काही काळापासून त्यांना मान आणि पाठदुखीचा त्रास आहे. “आताशा मी कुठेच जात नाही, घर सोडतच नाही. या पोरांवर लक्ष ठेवणं माझं काम,” दुपारची झोप काढणाऱ्या आपल्या दोन नातवंडांकडे पाहत चिमाबाई सांगतात.




