बाहेर सगळीकडे पारा ४७ डिग्रीच्या वर गेला असला तरी इथे कसं सगळं थंडगार आहे. आमच्यापासून जराशा अंतरावर एका पट्ट्यात तर तापमान उणे १३ अंश असल्याचं एक घड्याळात दिसतंय. भारतातला हा पहिला “हिम-घुमट”. कुठे तर रणरणत्या विदर्भात. इथला बर्फ गोठलेला रहावा यासाठी या कंपनीला दिवसाला ४,००० रुपये फक्त विजेवर खर्च करावे लागतायत.
तर, नागपूर (ग्रामीण) जिल्ह्यातल्या बाजारगावातल्या या फन अँड फूड व्हिलेज वॉटर अँड अम्यूझमेंट पार्कमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या भव्य संकुलाच्या प्रवेशद्वारी महात्मा गांधींची एक तसबीर पाहुण्यांचं स्वागत करते. रोज डिस्को, बर्फावरील स्केटिंग, बर्फावरच्या घसरगुंड्या आणि ‘कॉकटेलची रेलचेल असलेला बार’ तुमच्यासाठी सज्ज आहे. चाळीस एकर परिसरातल्या या पार्कमध्ये पाण्यातल्या अठरा विविध प्रकारच्या घसरगुंड्या आणि खेळ आहेत. आणि परिषदा, बैठका ते अगदी किटी पार्टी आयोजित करण्यासाठी सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत.
बाजारगावात (लोकसंख्या ३,०००) मात्र पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. “दिवसभरात पाण्यासाठी एवढ्या चकरा माराव्या लागतात की बायांना दिवसभरात १५ किलोमीटर तर चालावे लागते,” सरपंच यमुनाबाई उइके म्हणतात. “अख्ख्या गावात फक्त एक सरकारी विहीर. कधी चार दिवसांत तर कधी पाच दिवसात एकदा पाणी येते. कधी कधी तर दहा दिवसातून एकदा.”
२००४ साली जाहीर झालेल्या टंचाईग्रस्त प्रदेशांपैकी एक म्हणजे बाजारगाव. पण या आधी अशी वेळ या गावावर कधीच आली नव्हती. मे महिन्यापर्यंत इथे दररोज सहा तास – कधी कधी जास्तच – लोडशेडिंग होत होतं. याचा लोकांच्या जगण्यावर अगदी थेट परिणाम होत होता. लोकांचं आरोग्य असो किंवा मुलांचा अभ्यास. उन्हाळ्यात पारा ४७ अंशापर्यंत गेल्यावर तर लोकांचे हाल अधिकच वाढले.
फन अँड फूड व्हिलेजमध्ये मात्र गावासाठी लागू कडक नियम किंवा अपेष्टांचा मागमूसही नाही. बाजारगावाच्या स्वप्नातही येणार नाही इतकं सारं पाणी या मरुवनात आहे. वीज तर सेकंदासाठीही जात नाही. “सरासरी काढायची तर महिन्याला आम्ही विजेचं चार लाख रुपये बिल भरतो,” पार्कचे जनरल मॅनेजर जसजीत सिंग सांगतात.






