या आठवड्यात जात्यावरच्या ओव्यांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या कोळवडे गावच्या मुक्ताबाई उभे आणि सीताबाई उभेंनी गायलेल्या पंढरपूरच्या वारीवरच्या पाच ओव्या सादर करत आहोत.
ओव्यांच्या या मालिकेत पंढरपूरच्या वारीवरच्या या पाच ओव्या. वर्षातून दोनदा पंढरीची वारी होते. विठ्ठलाचे भक्त (म्हणजेच विठोबा किंवा पांडुरंग) महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरला पायी जातात. त्यांच्या माउलीला पंढरीला जाऊन भेटतात. या साऱ्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे की विठोबा त्यांचं ऐकतो, त्यांची काळजी घेतो आणि त्याचं स्थान या सगळ्यांच्या मनात माऊलीसारखं, आईसारखं आहे. एकवीस दिवस पायी चालत पंढरीला पोचणारा हा वारकरी.
हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षातून दोनदा पंढरपूरची वारी निघते. पहिली आषाढात (जून-जुलै) आणि दुसरी कार्तिकात (ऑक्टोबर-नोव्हेंबर). आषाढी वारी जास्त प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे कारण अगदी परेण्यांनंतर ती सुरू होते. वारीला जाणाऱ्यांमध्ये शेतकरी आहेत, धनगर आहेत, गुराखी आहेत आणि ग्रामीण भागातले बहुसंख्य लोक आहेत. गावाकडनं शहरात कामासाठी येऊन स्थायिक झालेले कित्येक जणही नेमाने वारी करतात.
तेराव्या शतकात ज्ञानेश्वरी लिहून भगवद् गीता मराठीमध्ये आणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या घराण्यात वारीची परंपरा होती. ते नेमाने वारी करत. १७व्या शतकात संत तुकारामांनीदेखील वारीची परंपरा कायम ठेवली. त्यांनी लिहिलेल्या गाथा तुकाराम गाथा म्हणून प्रसिद्ध आहेत. तेराव्या शतकातल्या जनाबाई, मुक्ताबाई आणि नामदेवांसारख्या संतांनीही वारी केली आहे.
या सगळ्या संतांचं दैवत म्हणजे विठ्ठल. हे सगळे भक्ती परंपरेतले थोर कवी. भक्ती परंपरा सातव्या शतकात दक्षिणेत सुरू झाली आणि १२ व्या ते १८ व्या शतकात उत्तरेकडे पसरली. अतिशय प्रगत असणाऱ्या या परंपरेतली कवनं, अभंग समाज सुधारण्यासाठी लिहिले गेले आहेत.




