रमेश उकर, वय ५८, २८ नोव्हेंबरला सकाळी लवकर उठतात. त्यांच्या डोक्यात दोनच गोष्टी आहेत. “मला मत द्यायचंय,” ते सांगतात. “आणि उद्या दिल्लीला पोचायचंय.”
उकर मध्य प्रदेशाच्या झाबुआ जिल्ह्यातल्या पेतलावाद तालुक्यातल्या मानस्या गावचे रहिवासी. इथून सर्वात जवळचं रेल्वे स्थानक म्हणजे इंदोर – सुमारे १५० किमीवर. इंदोरहून रेल्वेने दिल्लीला यायला १४ तास लागतात. “मी आदल्या रात्रीच माझे कपडे बांधून ठेवले होते, सकाळी बायकोला सांगितलं की प्रवासासाठी शिदोरी बांधून दे म्हणून,” २९ नोव्हेंबरच्या सकाळी गुरुद्वारा श्री बाला साहिबजीच्या आवारात हातात काठी घेऊन उकर बसलेत. “मी मत टाकलं आणि दुपारी घर सोडलं. संध्याकाळी बसनी इंदोर गाठलं, आणि तिकडून रात्रीची गाडी पकडली.”
मध्य प्रदेश विधान सभेचं मतदान २८ नोव्हेंबरला पार पडलं आणि २९ नोव्हेंबरला देशभरातल्या २०० हून अधिक शेतकरी संघटनांच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने तब्बल ५०,००० शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीत आयोजित केला होता. देशातल्या कृषी संकटावर चर्चा करण्यासाठी संसदेचं २१ दिवसांचं संयुक्त सत्र घेण्यात यावं या मागणीसाठी दोन दिवस दिल्लीमध्ये आंदोलन करण्यासाठी शेतकरी गोळा झाले होते. या संकटामुळे १९९५ ते २०१५ या काळात किमान ३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.





