दोन गर्भं आहेत, खाजगी प्रसूतीगृहातल्या डॉक्टरांना रोपी अगदी ठामपणे सांगत होती. कसलाही सोनोग्राफी रिपोर्ट वगैरे नसला तरीही.
दोन वर्षांपूर्वीचा हा प्रसंग रोपी मन्नू बेते अगदी खुलून, रंगवून सांगते. “कान में वो लगाया,” कानात स्टेथोस्कोप लावायची नक्कल करत ती म्हणते. समोर निजलेल्या किडकिडीत अंगाच्या गरोदर बाईचं लहानसं पोट पाहून डॉक्टरांनी वेगळं निदान केलं आणि रोपीचा अंदाज मान्य नसल्याचं सांगितलं.
“मेडम, दो होता दो,” ती परत परत सांगत राहिली. आणि मग कंटाळून दवाखान्याच्या प्रसूती खोलीतल्या एका स्टुलावर जाऊन बसली. सत्तरी पार केलेली रोपी आणि अडलेली, वेणांनी थकून गेलेली गरोदर बाई मेळघाटातल्या जैतादेही या त्यांच्या गावापासून २० किलोमीटरवर परतवाड्यातल्या दवाखान्यात गेल्या होत्या.
संध्याकाळी मुलगा जन्मला आणि काही सेकंदात अजून एक डोकं दिसायला लागलं. आणि पाठोपाठ त्याची जुळी बहीण जन्मली.
रोपी तिच्या घराच्या ओसरीत एका टोकाला लाकडी खाटेवर बसली होती. मातीच्या भिंतींचं पारंपरिक बांधकाम असलेलं घरं शेणाने लख्ख सारवलेलं होतं. घराला तीन खोल्या आहेत. पण घरात दुसरं कुणीच नाही. घरची दोन एकर शेती आहे आणि रोपीची मुलं शेतात गेलीयेत.
कोरकू भाषेत तिने एक चांगली शिवी हासडली – मराठीत ज्याचा अर्थ होतो गाढवाची ***. मला सांगता सांगता रोपी परत हसायला लागते. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या खोल जातात. “तिला तेच म्हटलं मी,” शहरातल्या डॉक्टरला शिवी दिल्याची आठवण तिला सुखावून गेल्यासारखी वाटते.











