“तुम्ही फार लवकर आलाय. रविवारी ४ वाजायच्या आत ते इथे येत नाहीत. आता यायचं कारण म्हणजे मी पेटी वाजवायला शिकतीये,” ब्यूटी सांगते.
‘इथे’ म्हणजे बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातल्या मुसाहरी तालुक्यातल्या चतुर्भुज स्थान या कुंटणखान्यात. ‘आता’ म्हणजे सकाळी १० वाजता जेव्हा तिची आणि माझी भेट झाली. ‘ते’ म्हणजे तिच्याकडे संध्याकाळी येणारे गिऱ्हाईक. ब्यूटी – कामावरचं तिचं नाव – धंदा करते, १९ वर्षांची आहे. गेल्या पाच वर्षांपासून या धंद्यात असलेली ब्यूटी ३ महिन्यांची गरोदर आहे.
धंदा सुरूच आहे. ती सध्या पेटी शिकतीये कारण “अम्मी म्हणते की संगीताचा माझ्या बाळावर चांगला परिणाम होईल.”
बोलता बोलता पेटीच्या बटनांवरून तिची बोटं फिरतायत. ती म्हणते, “हे माझं दुसरं बाळ आहे. माझा थोरला मुलगा दोन वर्षांचा आहे.”
आम्ही ज्या खोलीत बसलोय – ही तिची कामाची खोली आहे – तिथे जमिनीवर एक भली मोठी गादी घातलेली आहे. तिच्या मागे भिंतीवर ६ फूट बाय ४ फूट आकाराचा मोठा आरसा लावलाय. ही खोली अंदाजे १५ फूट बाय १५ फूट आकाराची असेल. गादीवर उश्या आणि तक्के आहेत. मुली मुजरा सादर करतात तेव्हा गिऱ्हाइकांना आरामात रेलून बसता यावं यासाठी ही सगळी सोय केलेली आहे. मुजरा या नृत्यप्रकाराप्रमाणे चतुर्भुज स्थान देखील मुघलांच्या काळापासून इथे आहे असं म्हटलं जातं. इथे काम करणाऱ्या सगळ्या मुली आणि स्त्रियांना मुजरा यायलाच लागतो. ब्यूटीला तर येतोच.












