केसात अबोली आणि सोनटक्क्याची फुलं माळलेली, लाल, निळ्या, हिरव्या, मोतिया रंगाच्या साडीवर लाल बॅज अडकवलेला. या संथ, शांत दुपारी डहाणू स्थानकाचा तीन नंबर फलाट त्यांच्या रंगीबेरंगी साड्यांनी उजळून निघालाय. १०० किमी प्रवास करून दक्षिण मुंबईत शिकायला जाणारे विद्यार्थी किंवा उत्तरेकडे काही किलोमीटरवर उंबरगावसारख्या गावांमध्ये कामाला जाणारे कामगार आणि इतर प्रवाशांबरोबर त्याही गाडीची वाट बघत थांबल्या आहेत.
वारली समुदायाच्या या महिला शेतकऱ्यांच्या जोडीला पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातले इतर स्त्री पुरुष शेतकरी येणार आहेत.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दिल्लीमध्ये २९-३० नोव्हेंबर रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, त्यात सहभागी होण्यासाठी या बाया निघाल्या आहेत. देशभरातल्या २०० हून अधिक शेतकरी संघटनांची ही समन्वय समिती आहे, ज्यात अखिल भारतीय किसान सभाही सामील आहे. डहाणू स्थानकात थांबलेले शेतकरी किसान सभेचे सभासद आहेत. कृषी संकटावर चर्चा करण्यासाठी संसदेचं तीन आठवड्यांचं संयुक्त सत्र आयोजित करावं, ज्यात तीन दिवस शेतकरी बायांच्या मागण्यांवर चर्चा व्हावी अशी त्यांची मागणी आहे.









