गेल्या तीन वर्षांत तुम्ही किती दवाखान्यांना गेला आहात?
हा प्रश्न ऐकल्यावर सुशीला देवी आणि तिचा नवरा मनोज कुमार यांचा चेहरा थकव्याने आणि दुःखाने काळवंडून गेला. २०१७ साली बंदीकुई शहरातल्या मधुर हॉस्पिटलमध्ये सुशीलाची नसबंदी झाली त्यानंतर किती प्रकारच्या तपासण्या, आजाराचं वेगवेगळं निदान आणि किती दवाखान्यांच्या पायऱ्या त्यांनी झिजवल्या आहेत याची गणतीच या दोघांनी (नावं बदलली आहेत) ठेवणं सोडून दिलंय.
लग्नानंतरच्या १० वर्षांमध्ये तीन मुलींच्या पाठीवर चौथा मुलगा झाल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून सुशीलाची नसबंदी करून घेण्याचं ठरवलं, जेणेकरून कुटुंबाकडे आणि आयुष्याकडे चांगल्या तऱ्हेने लक्ष देता यावं. राजस्थानच्या दौसा तहसिलातलं धणी जमा हे त्यांचं गाव. तिथून २० किलोमीटरवर असणाऱ्या बंदिकुईतला खाजगी दवाखाना हा त्यांच्यासमोरचा पहिला पर्याय होता. खरं तर धणी जमाहून तीन किलोमीटरवरच्या कुंदल गावात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
“तिथल्या [सरकारी] दवाखान्यांमध्ये बहुतेक वेळा नसबंदी शिबिरं हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये भरवली जातात. बायांना पण हिवाळ्यातच ऑपरेशन करून घ्यायचं असतं कारण थंडीच्या दिवसात टाके लवकर भरून येतात. उन्हाळ्यात जर त्यांना ऑपरेशन करून घ्यायचं असेल तर आम्ही त्यांना दौसा आणि बंदिकुईच्या खाजगी रुग्णालयांमध्ये घेऊन जातो,” आशा कार्यकर्ती असणारी ३१ वर्षांची सुनीता देवी सांगते. तीच सुशीला आणि मनोजबरोबर मधुर हॉस्पिटल या २५ खाटांच्या रुग्णालयात गेली होती. हे रुग्णालय राज्य कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलं असल्यामुळे सुशीलाला नसबंदीसाठी पैसे भरावे लागले नाहीत. उलट तिला प्रोत्साहनपर भत्ता म्हणून १,४०० रुपये मिळाले.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर, सुशीलाची पाळी आली आणि त्यानंतर पुढची तीन वर्षं असह्य वेदना आणि अशक्तपणाचं दुष्टचक्र सुरू झालं.
“पहिल्यांदा जेव्हा तिला दुखायला लागलं, तेव्हा मी घरी होत्या त्या वेदनाशामक गोळ्या तिला दिल्या. त्याने थोडा आराम पडला. पण दर महिन्यांत पाळीच्या वेळी तिला रडू कोसळायचं,” २९ वर्षीय मनोज सांगतो.
“दुखणं वाढतच गेलं आणि अंगावरून इतकं जास्त जायचं की मला मळमळायला लागायचं. सारखा अशक्तपणा असायचा,” सुशीला सांगते. ती आठवीपर्यंत शिकलेली आहे आणि घरचं सगळं पाहते.
तीन महिने हे असंच सुरू राहिल्यानंतर मात्र हो-नाही करत हे दोघे कुंदलमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले.







