वांगणीमधल्या आपल्या दोन खोल्यांच्या घरातल्या लहानशा मोरीत विमल ठाकरे कपडे धुतायत. आपल्या अशक्त हातांनी त्या काही साड्या, सदरे आणि इतर कपड्यांच्या गठ्ठ्यावर हिरव्या प्लास्टिकच्या मगातून पाणी टाकतायत.
त्यानंतर त्या प्रत्येक कपडा नाकापाशी आणतात आणि परत परत त्याचा वास घेतात, तो पूर्ण स्वच्छ झालाय की नाही ते पहायला. त्यानंतर भिंतीला धरून, दरवाजाच्या चौकटीचा अंदाज घेत, त्या मोरीतून बाहेर येतात, पण उंबऱ्याला अडखळतात. त्यानंतर खोलीत येऊन माझ्याशी बोलायला म्हणून पलंगावर येऊन बसतात.
“आम्ही सगळी दुनिया स्पर्शातूनच पाहतो, आणि स्पर्शातूनच आम्हाला आमच्या आजूबाजूचं भान येतं,” ६२ वर्षीय विमल सांगतात. त्या आणि त्यांचे पती नरेश, दोघंही अंध आहेत. मुंबईच्या पश्चिम रेल्वे लाइनवरच्या गाड्यांमध्ये चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान ते रुमाल विकत असत. कोविड-१९ मुळे २५ मार्चपासून देशव्यापी टाळेबंदी जाहीर झाली आणि लोकल गाड्या थांबल्या, तेव्हापासून ते काम पूर्ण थांबलंय.
मुंबईच्या जीवघेण्या गर्दीशी झुंज देत, ते दोघं मिळून टाळेबंदीच्या आधी दिवसाला जास्तीत जास्त २५० रुपये कमवायचे – थोडी विश्रांती म्हणून रविवारी सुट्टी. दक्षिण मुंबईच्या मस्जिद बंदरमधल्या ठोक बाजारात ते रुमाल विकत घ्यायचे, एका वेळी १००० नग. टाळेबंदीच्या आधी रोज १० रुपयाला एक असे किमान २०-२५ रुमाल विकले जायचे.
त्यांचा मुलगा, ३१ वर्षांचा सागर १० वी पास आहे आणि टाळेबंदी लागेपर्यंत एका ऑनलाइन कंपनीच्या ठाण्यातल्या गोदामात कामाला होता. त्याची बायको मंजू घरकामगार आहे. ते दोघं मिळून त्यांच्या घरच्या पुंजीत महिन्याला ५,००० ते ६,००० रुपयांची भर घालत होते. विमल आणि नरेश, सागर आणि मंजू आणि त्यांची मुलगी, तीन वर्षांची साक्षी असे सगळे एकत्र त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात राहतात. “आता ३,००० रुपये भाडं, वर रेशन, औषधं आणि अधून मधून डॉक्टरला द्यायची फी असं सगळं भागवायचं म्हणजे अवघड झालंय,” नरेश सांगतात.









