"या गावात छोटी मोठी अशी ८० ते ९० भारवाड कुटुंबं आहेत," कांताबेन सांगतात. "हरिजन [दलित], वागरी, काही ठाकोर समाजाची आणि काही कुंभारांची घरंही आहेत. पण बहुतेक सगळी कुटुंब भारवाडच." ठाकोर कोळी ही गुजरातमधली एक मोठी जात आहे – इतर राज्यांतील ठाकूर जातीशी हिचा काही संबंध नाही.
"आमच्यात मुलींचं लवकर लग्न होतं पण त्या १६ किंवा १८ वर्षांच्या होईस्तोवर माहेरीच राहतात अन् नंतर सासरी जातात," पन्नाशीत असलेल्या कांताबेन समजावून सांगतात. त्यांची मुलगी आशा हिचं लवकर लग्न झालं, तिला वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत तीन मुलं झालीत आणि आता चौथं मूल पोटात आहे. या समाजात बालविवाहाची पद्धत असून बहुतांश महिलांना त्यांचं वय, लग्नाचं वर्ष, किंवा पहिलं बाळंतपण झालं तेंव्हा त्यांचं वय काय होतं याची स्पष्ट कल्पना नाही.
"लग्न कधी झालं ते आठवत नाही, पण मी दर एका वर्षाआड गरोदर राहायची," कांताबेन म्हणतात. त्यांच्या आधार कार्डवरील तारीख त्यांच्या स्मरणशक्ती एवढीच भरवशाची आहे.
"मला नऊ मुली आहेत आणि हा दहावा – मुलगा," त्या दिवशी जमलेल्या महिलांपैकी एक हीराबेन भारवाड म्हणतात. "मुलगा आठवीत आहे. मुलींपैकी सहा जणींचं लग्न झालंय, दोघींचं व्हायचंय. त्यांची जोडीनं लग्न लावलीत." या तालुक्यातील खानपर आणि इतर गावांमधील समाजात लागोपाठची बाळंतपणं काही वावगी नाहीत. "आमच्या गावी एकीला तर १३ वेळा गर्भ पडल्यानंतर मुलगा झाला," हीराबेन म्हणतात. "वेडेपणा आहे सगळा. इथले लोक मुलगा होईस्तोवर पाहिजे तितक्या वेळा बाळंतपण होऊ देतात. त्यांना काहीच कळत नाही. त्यांना मुलगा हवा फक्त. माझ्या सासूला [तोवर] आठ मुलं झालीत. काकूला तर १६ होती. आता बोला?"
"सासरच्यांना मुलगाच हवा," रमिला भारवाड म्हणतात. "अन् आपण जर त्यासाठी प्रयत्न केले नाही, तर सासू-नणंदेपासून शेजाऱ्यांपर्यंत सगळे जण टोमणे मारतात. अशात मुलांना वाढवणं काही सोपी नाही. माझा मोठा मुलगा दोनदा १०वी नापास झालाय अन् आता तिसऱ्यांदा पुन्हा परीक्षेला बसतोय. मुलं वाढवणं म्हणजे काय ते फक्त आम्हा बायांनाच कळतं. पण आम्ही करणार तरी काय?"
कुटुंबात मुलाला इतकं प्राधान्य असल्यामुळे महिलांकडे प्रजनन अधिकार नावापुरतेच उरतात. " देवच आम्हाला मुलगा होण्यासाठी वाट पाहायला लावत असेल तर काय करणार?" रमिला विचारतात. "मलाही मुलगा होण्याआधी तीन मुली झाल्या. अगोदर आम्ही मुलगा होईस्तोवर वाट पाहायचो, पण आता गोष्टी जरा बदलल्या असतील."
"कसला बदल? मला नाही का चार मुली झाल्या?" रेखाबेन चिडून म्हणते. ती शेजारच्या १,५१२ लोकांची वस्ती असलेल्या लाना गावची आहे. अहमदाबादहून ५० किमी परिघाच्या आत असलेल्या तालुक्यातल्या खानपर, लाना आणि अंबलीयारा गावाच्या विविध वस्त्यांमधून या महिला इथे आल्या आहेत. आणि आता त्या केवळ माझ्याशीच नाही, तर एकमेकींशीही संवाद साधू लागल्यात. परिस्थिती बदलली असेल हे रमिला यांचं म्हणणं रेखाबेन खोडून काढते. "मी सुद्धा फक्त मुलगा जन्मण्याची वाट पाहत राहिले, नाही का?" ती विचारते. "आम्ही भारवाड आहोत, आम्हाला मुलगा तर व्हायलाच हवा. फक्त मुली झाल्या तर ते आम्हाला वांझ म्हणतात."