जवळातल्या जवळ आरोग्य सेवा मिळण्याची शक्यता असलेल्या दवाखान्यात जायचं तर धरणाच्या जलाशयात सुरू असणारी बोट पकडून दोन तासांचा प्रवास करावा लागणार. नाही तर पर्याय म्हणजे उंच डोंगररांगांमधून अर्धवट बांधलेल्या रस्त्याने प्रवास करून जायचं.
प्रबा गोलोरीचा नववा महिना भरलाय आणि बाळंतपण कधीही होऊ शकतं.
दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मी कोटागुडा पाड्यावर पोचले तेव्हा प्रबाच्या शेजारपाजारची मंडळी तिच्या झोपडीभोवती जमली होती. मूल काही जगायचं नाही असंच त्यांना वाटत होतं.
३५ वर्षांच्या प्रबाचा पहिला मुलगा तीन महिन्यांचा होऊन वारला. तिची मुलगी आता सहा वर्षांची आहे. गावातल्या सुइणींच्या मदतीने तिची दोन्ही बाळंतपणं घरीच पार पडली होती, फार काही त्रासही झाला नव्हता. पण या खेपेला मात्र सुइणी जरा खळखळ करत होत्या. त्यांच्या लक्षात आलं होतं की हे बाळंतपण अवघड जाणार आहे.
मी जवळच्याच एका गावात वार्तांकनासाठी गेले होते तेव्हाच फोन वाजला. माझ्या मित्राची मोटरसायकल घेऊन (डोंगरातल्या वाटांवर माझी नेहमीची स्कूटी काही उपयोगाची नव्हती), मी कोटागुडाला पोचले. ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातला हा जेमतेम ६० लोकांचा पाडा.
चित्रकोंडा तालुक्यातल्या या गावी पोचणं खडतरच आहे. सोबत मध्य भारतातल्या आदिवासी पट्ट्यातल्या इतर गावांप्रमाणे इथे देखील राज्याचं सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये कायमच संघर्ष सुरू आहे. इथे अनेक ठिकाणी रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा अपुऱ्या आणि विरळ आहेत.












