माहितीचा स्रोत बदलला की ही आकडेवारीदेखील बदलते. पेय जल व स्वच्छता मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे २०१६-१७ मध्ये महाराष्ट्रातल्या तब्बल २,०८६ जलस्रोतांमध्ये फ्लुरॉइड आढळून आलं – सोबत नायट्रेट आणि आर्सेनिकदेखील सापडलं आहे. हे दोन्ही घातक आहेत. हा आकडा गेल्या काही वर्षांत कमी झाला आहे – २०१२-१३ मध्ये हा आकडा होता ४,५२०. २०१४ मध्ये नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नांदेड जिल्ह्यात ३८३ गावांच्या जलस्रोतांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त फ्लुरॉइड आढळून आलं. यातल्या २५७ गावांना पाण्याचे पर्यायी स्रोत पुरवण्यात आले होते. २०१५-१६ मध्ये मात्र भूजल सर्वेक्षण विभागाने नांदेड जिल्ह्यातली केवळ ४६ गावं फ्लुरोसिसने बाधित असल्याचं जाहीर केलं आणि त्यातल्या केवळ ४ गावांमधली समस्या अजून हाताळली गेली नसल्याचं नमूद केलं.
अॅड. असीम सरोदे यांच्या नेतृत्वाखाली नऊ वकिलांनी गावातल्या लोकांना फ्लुरॉइडयुक्त पाणी प्यायला लागत असल्यासंबंधी एक याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केली. त्यावर ११ जानेवारी २०१६ रोजी लवादाने आदेश दिला की महाराष्ट्रातल्या १२ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि भूजल सर्वेक्षण विभागाने पाण्याच्या दर्जावर लक्ष ठेवावे, जिल्हानिहाय माहिती सादर करावी, पाण्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध करून द्यावेत आणि रुग्णांना निःशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. सोबत इतरही काही उपाययोजना हाती घ्याव्यात. या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली हे लक्षात आल्यावर २८ नोव्हेंबर २०१७ रोजी लवादाने १२ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने एक अधिपत्र काढले. यात नांदेड, चंद्रपूर, बीड, यवतमाळ, लातूर, वाशिम, परभणी, हिंगोली, जालना आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होता.
दरम्यान, सावरखेडहून २०० किमीवर असलेल्या सुनेगाव (सांगवी) मध्ये आता एक खणलेली विहीर आहे. आधी मात्र इथे अशी एकही विहीर नव्हती. २००६ मध्ये लिंबोटी धरणाचं काम झालं आणि लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या ६३० वस्तीच्या या गावाजवळ पाण्याचा एक तलाव तयार झाला. पाण्याचा पाझर वाढल्यामुळे २००७ साली विहीर खणल्यावर तिला पाणी लागलं.
पण हे सर्व होईपर्यंत सुयश ढवळेंनी त्यांच्या ३० वर्षं आयुष्यातली २० वर्षं फ्लुरॉइडने बाधित पाणी प्यायलं आहे. आणि सावरखेडच्या इतरांसारखीच आपलीही तब्येत ढासळताना पाहिली आहे. “मला सतत माझ्या दातावर काही तरी थर चढलाय असं वाटत राहतं,” शेतमजुरी करणारे ढवळे सांगतात. झाडाखालून उठताना त्यांच्या सांध्यांची कुरकुर स्पष्ट ऐकू येते. “काही काळाने तो थर गळून पडतो आणि त्याबरोबर दाताचा तुकडाही निखळून पडतो. मी काहीही टणक पदार्थ खाऊ शकत नाही. माझे सांधेही दुखतात. फार काळ काम नाही करता येत मला.”
सुनेगाव (सांगवी) पासून आठ किमीवर असलेल्या अहमदपूरमधल्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेच्या प्रमुखाला मी फ्लुरोसिस होण्याची शक्यता असणाऱ्या गावांची यादी देण्याची विनंती केली. संगणकावर त्याने ती यादी शोधली; शेजारचं सुनेगाव शेंदरी लातूर जिल्ह्यातल्या अशा २५ गावांच्या यादीत होतं. सुनेगाव शेंद्रीचे ३५ वर्षीय गोविंद काळे माझ्यासोबत होते, ते अचानक उद्गारले, “आम्ही वर्ष झालं बोअरचंच पाणी प्यायलोय. गावातली खोदलेली विहीर कोरडी पडलीये. आख्खं गाव बोअरचंच पाणी प्यायलंय. कुणीच यावर काहीच कसं करंना? आम्हाला कुणी काही सांगितलं बी नाही.”
आठ वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशमधील नलगोंडा गावात (आता तेलंगणामध्ये) ही समस्या सर्वात आधी उजोडात आली होती. त्यावर क्रिपल्ड लाइव्ज [पांगळी आयुष्यं] नावाचा एक बोधपटदेखील बनवण्यात आला होता. त्यापासनं आपण काहीही शिकलो नाही असंच म्हणावं लागेल हे निश्चित.