पूनम राणीच्या केसांचा भांग पाडते, डोक्याला चपचपून तेल लावते आणि कसून वेणी वळते. आता ती त्याला रबर लावणार तोच राणी बाहेर खेळायला धूम ठोकते. तिची भावंडं आणि मित्रमैत्रिणी खेळण्यासाठी तिची वाट पाहात असतात. ‘‘दोस्त सब के आबितै, ई सब सांझ होइते घौर सा भाग जाई चाई खेला लेल (संध्याकाळी मित्रमंडळी आली रे आली की लगेच सगळे खेळायला बाहेर पळतात),’’ संध्याकाळचा स्वयंपाक करता करता पूनम देवी सांगते. आठ वर्षांची राणी तिची दुसरी मुलगी.
पूनमला तीन मुली आणि एक मुलगा. मुलगा सर्वात धाकटा. पण चार मुलांपैकी फक्त या धाकट्या मुलाचा जन्म दाखला (बर्थ सटिर्फिकेट) आहे तिच्याकडे. ‘‘हमरा लाग में इत्ते पाई रहितै त बनवाइए लेतिए सबइके (माझ्याकडे पैसे असते, तर बनवून घेतले असते सगळ्यांचे),’’ ती म्हणते.
मधुबनी जिल्ह्यात बेनिपट्टी तालुक्यातल्या एकतारा गावात ग्रामीण बिहारमधल्या अनेक घरांसारखंच पूनमचं विटामातीचं घर आहे. त्याला बांबूच्या कामट्यांचं कुंपण आहे. तिचा नवरा, ३८ वर्षांचा मनोज रोजंदारीवर मजुरी करतो. तो महिन्याला साधारण ६,००० रुपये कमावतो.
‘‘माझं वय २५ वर्षं आणि काही महिने आहे,’’ पूनम सांगते. (या लेखात व्यक्तींची नावं बदलली आहेत). ‘‘माझं आधार कार्ड माझ्या नवर्याकडे आहे आणि तो आता घरी नाही. माझं लग्न झालं तेव्हा मी नेमकी किती वर्षांची होते ते नाही आठवत मला.’’ पूनम आत्ता २५ वर्षांची असली तर लग्न झालं तेव्हा ती साधारण १४ वर्षांची असणार.
पूनमच्या सर्व मुलांचा जन्म घरीच झाला आहे. ‘‘दाईनेच केली आहेत सगळी बाळंतपणं. परिस्थिती गंभीर असेल तरच आम्ही रुग्णालयात जाण्याचा विचार करतो,’’ मनोजच्या काकी, ५७ वर्षांच्या शांती देवी सांगतात. त्याच वस्तीत त्या पूनमच्या जवळ राहातात. पूनमला त्या स्वतःची सून मानतात.







