जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत कोळावडे गावच्या लीलाबाई कांबळे आईची जागा दुसरी कुणीच घेऊ शकत नाही असं गातायत तर ताराबाई उभे जावयाला आता सततच्या मागण्या थांबव असं सुचवतायत
“गावचे पुढारी आणि चोर स्वतःच्या डोक्याने चालणाऱ्या सरपंचाला, मग ती बाई असो किंवा पुरुष, कधीच पाठिंबा देत नाहीत. त्यांची टेंडरं पास करणाऱ्याच्याच ते मागे असणार,” पुणे जिल्ह्याच्या कोळवडे गावच्या ५८ वर्षाच्या लीलाबाई कांबळे सांगतात. कुळाने शेत कसणाऱ्या लीलाबाई पुढे म्हणतात, “आन् का बाई सरपंच असेल तर मग तिचा नवरा किंवा सासराच सगळा कारभार ताब्यात घेतो. तिच्यावर पूर्ण त्यांचीच सत्ता चालते. आणि जर एखाद्या बाईने तिचं स्वतःचं, स्वतंत्र मत मांडायचं ठरवलं तर तिच्याच घरचे तिच्या पायात खोडा घालतात.”
लीलाबाई गरीब डोंगरी संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या डोंगरी भागातल्या गरिबांसोबत ही संघटना काम करते. संघटनेने सुरू केलेल्या साक्षरता वर्गात त्या लिहायला वाचायला शिकल्या आणि इतक्या वर्षांमध्ये त्यांची स्वतःची गावच्या राजकारणाबद्दल ठाम अशी काही मतं तयार झाली आहेत.
लीलाबाईंच्या घरी त्यांचे पती विठ्ठल, मुलगा संतोष, सून शीतल आणि शाळेत जाणारी यश आणि सोहम ही नातवंडं असा परिवार आहे. ते कुळकरी आहेत आणि १० ते २० गुंठ्याचं रान बटईने कसतात. निम्मा माल जमिन मालकाला जातो. अर्थात त्यांची इतर दोन मुलं अशोक आणि नंदकुमार पुण्यात बांधकाम मजूर म्हणून काम करतात.






