“मत द्यायला माझी बोटं चालतात, मग त्या आधारला कार्डाला का बरं चालत नाहीत?” ५१ वर्षांच्या पार्वती देवी त्यांचं मतदार ओळख पत्र दाखवत मला विचारतात. १९९५ पासून प्रत्येक निवडणुकीत या कार्डाच्या आधारे त्यांनी मतदान केलं आहे.
तीन वर्षांपूर्वी पार्वतीदेवींना कुष्ठरोग झाला आणि त्यांची बोटं झडली. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम– वार्षिक अहवाल २०१६-१७ नुसार भारतात ८६,००० व्यक्तींना कुष्ठाची बाधा झाली आहे. आणि अर्थात या केवळ नोंदवल्या गेलेल्या केसेस आहेत. याहूनही अधिक व्यक्तींना या रोगाची लागण होत असल्याचं दिसून येतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगभरात नोंदल्या गेलेल्या दर पाच कुष्ठरुग्णांपैकी तीन भारतात आहेत.
कुष्ठरोगामुळे आलेल्या अपंगत्वासाठी राज्य शासनाचं रु. २५०० पेन्शन मिळण्यास पार्वती पात्र आहेत, पण याची खरी कळ आहे हुकुमी एक्क्यासारखं असलेलं आधार कार्ड. आणि हेच आधार कार्ड मिळवण्याचे त्यांचे आजवरचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत.
“दोन वर्षांपूर्वी माझ्या मुलाने मला सांगितलं की माझ्याकडे आधार कार्ड असेल तर मला पेन्शन मिळू शकतं. तेव्हापासून मी हे कार्ड मिळवण्यासाठी खटपटी करत आहे. पण सगळे जण मला हेच सांगतायत की माझी बोटं धड नाहीत त्यामुळे मला हे कार्ड काढता येणार नाही,” त्या सांगतात.





