“किती तरी वेळा, शेवटची निघणारी मीच असते, दुपारची २ ची वेळ असते. मग मी मस्टर रोल घेते आणि पळू लागते. घरी पोचेपर्यंत दम नसतो. मागून कुणी येत नाही ना, म्हणून सतत मागे नजर असते. आता भीती वाटते पण दुसरा काही पर्यायही नाहीये. आम्हाला जावंच लागतं ना. पैशाची गरज आहे,” चंपा रावत सांगतात.
झपाझप चालत, डोक्यावरचा घुंघट सारखा करत चंपा थाना गावातल्या मनरेगाच्या कामाची माहिती मला देते. तिच्या गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जमिनीच्या एका तुकड्यावरची पाणलोटाची कामं ती मला दाखवते. आणि म्हणते, “ही आमची कामाची जागा. पण या वेळेला [एप्रिल २०१९] त्यांनी आम्हाला चार किलोमीटरवरची जागा दिलीये. यापेक्षा निर्जन.” तिथे पोचायला एक तास आणि परत यायला एक तास चालावं लागतं. २००५ साली केंद्र सरकारने आणलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम (मनरेगा) या पथदर्शी योजनेचे लाभ आणि काही कमतरतांचा पाढा म्हणजे चंपाची कहाणी. ग्रामीण भागातल्या कुटुंबांना वर्षाला १०० दिवस रोजगार पुरवण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे.
राजस्थानच्या भिलवारा जिल्ह्यामध्ये – जिथे मंडल तालुक्यातलं थाना हे चंपाचं गाव आहे – या योजनेखाली २०१९ साली ८,६२,१३३ कुटुंबांना हा अत्यावश्यक रोजगार मिळाला आहे. आणि २०१३ पासून भिलवारातल्या एकूण ६० लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.
या रोजगारामुळे अनेकांची घरं चालतात. यातलीच एक आहे मीना साळवी. ती केवळ १९ वर्षांची आहे आणि आपल्या आजारी आई-वडलांची जबाबदारी घेते. घरची ती एकटी कमावती आहे. मीना देखील अशा निर्जन ठिकाणी कामं काढतात त्यातल्या समस्यांबद्दल बोलते. “मला भीती वाटते कारण मला देखील एकटीला परत यावं लागतं. खास करून मी शेवटी एकटीच राहिलेले असले तर खूपच.”
मे महिन्यात चंपाकडच्या कामावर काम करणाऱ्या २५ मजुरांनी, सगळ्या महिला, इतक्या लांब काम दिल्याच्या निषेधार्थ काम बंद पाडलं. त्यांना अशी भीती वाटत होती की आज या साइटवर जायला त्या तयार झाल्या तर पंचायत त्यांना पुढच्या वेळी अजून दूर पाठवेल. “जवळच्या किती तरी साइट आहेत जिथे काम करण्याची गरज आहे,” चंपा म्हणते. “मधलं जंगल सोडलं तर तिथे पोचण्याचा दुसरा काही मार्ग देखील नाहीये. कधी कधी तिथे जंगली प्राणी असतात, कधी दारुडे...” त्याच साइटवर काम करणारी सविता रावत सांगते. आठवडाभर आंदोलन केल्यानंतर या मजूर परत कामावर आल्या कारण त्यांना पैशाची निकड होती. काही जणींनी मात्र चंपाची साथ सोडली नाही आणि महिन्यानंतर त्यांना कामाचं ठिकाण बदलून देण्यात आलं.








