चमनी मीना यांना आपलं वय नीटसं आठवत नाही, पण अन्नाला पूर्वी चांगली चव होती, हे मात्र त्यांना चांगलंच आठवतं: "सगळी चव बदलली आता. आता पूर्वीसारखा स्वाद येत नाही. देशी बीच राहिलं नाहीये. वेगवेगळं वाण मिळणं तर मुश्किलच होऊन बसलंय."
राजस्थानमधील उदयपूर शहराच्या वेशीला लागून असलेल्या घाटी गावात राहणाऱ्या चमनीबाई, ज्यांच्या मते त्यांचं वय ८० च्या दरम्यान असावं, लहान असल्यापासून बी साठवतायत. चमनीबाईंना त्यांनी त्यांच्या नवऱ्यासोबत मिळून घर कसं बांधलं आणि शेती कशी सुरु केली, निव्वळ उदरनिर्वाहासाठी किती कष्ट उपसावे लागायचे, हे आठवतं. तरी, त्या म्हणतात, त्यांच्या तरुणपणी जीवन आणि जेवण दोन्हीही चांगले होतं.













