आता ८२ वर्षं वय झालंय, आरिफांनी सगळी दुनिया पाहिलीये. त्यांच्या आधार कार्डानुसार, १ जानेवारी १९३८ रोजी त्यांचा जन्म झालाय. ते अचूक आहे का हे काही आरिफांना माहित नाहीये. पण त्यांना इतकं आठवतं की विशीच्या रिझवान खान यांच्याशी दुसरेपणावर लग्न होऊन त्या हरयाणाच्या नूह जिल्ह्यातल्या बिवानमध्ये नांदायला आल्या तेव्हा त्यांचं वय होतं १६ वर्षं. “माझ्या आईने माझं लग्न रिझवानशी लावून दिलं कारण माझी मोठी बहीण [रिझवानची पहिली बायको] आणि तिची सहा मुलं फाळणीच्या दंगलीत चेंगराचेंगरीत मरण पावली,” आरिफा (नाव बदललं आहे) सांगतात.
मेवातमधल्या कुठल्याशा गावी महात्मा गांधी आल्याची आणि त्यांनी मिओ मुस्लिमांना देश सोडून पाकिस्तानात जाऊ नका अशी विनंती केल्याचं त्यांना पुसटसर आठवतं. दर वर्षी १९ डिसेंबर रोजी हरयाणातले मिओ मुस्लिम नुहमधल्या घसेरा गावी गांधींनी भेट दिली होती त्याची आठवण मेवात दिवस (२००६ पर्यंत नुहला मेवात म्हटलं जाई) म्हणून साजरा करतात.
आईने शेजारी बसवून आपण रिझवानशी लग्न करणं कसं योग्य आहे हे समजावून सांगितल्याची आठवण मात्र जरा ठळक आहे. “त्याच्यापाशी काहीच राहिलेलं नाही, माझी आई म्हणाली होती. मेरी माँने मुझे उसे दे दिया फिर,” आरिफा सांगतात. त्यांच्या रेथोरा गावापासून १५ किलोमीटरवर असलेलं बिवान त्यांचं गाव झाल्याच्या आठवणी त्या सांगतात. ही दोन्ही गावं देशात विकासाच्या निर्देशांकांची विदारक स्थिती असणाऱ्या या जिल्ह्यात आहेत.
देशाच्या राजधानीहून ८० किलोमीटरवर असलेलं बिवान हे फिरोझपूर झिरका तालुक्यातलं गाव हरयाणा आणि राजस्थानच्या सीमेवरच्या अरावली पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. दिल्लीहून नुहला जाणारा रस्ता हरयाणाच्या दक्षिणेला असणाऱ्या, देशात दरडोई उत्पन्नामध्ये तिसऱ्या क्रमांकावरच्या वित्तीय आणि औद्योगिक केंद्र असणाऱ्या गुरुग्राममधून येतो तो थेट तुम्हाला घेऊन जातो, देशातल्या सर्वात मागास जिल्ह्यांमध्ये ४४ व्या क्रमांकावर असणाऱ्या नुहमध्ये. हिरवी शेतं, शुष्क टेकड्या, पायाभूत सुविधांची वानवा आणि पाणी टंचाई हेच इथल्या आरिफासरख्या अनेकांचं आयुष्य आहे.
हरयाणाच्या या प्रदेशात आणि शेजारील राजस्थानच्या काही भागात मिओ मुस्लिम समाजाचं वास्तव्य आहे. नुह जिल्ह्यातील लोकसंख्येत मुस्लिमांचं प्रमाण ७९.२ टक्के आहे (जनगणना, २०११)
सत्तरीच्या दशकात आरिफांचे शौहर रिझवान यांनी बिवानपासून चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या वाळू, दगड आणि सिलिकाच्या खाणींमध्ये काम करायला सुरुवात केली आणि आरिफांचं आयुष्य या डोंगररांगांनी वेढून टाकलं. त्यांचं महत्त्वाचं काम म्हणजे पाणी भरून आणणं. बावीस वर्षांपूर्वी रिझवान वारले त्यानंतर आपल्या आठ मुलांचं पोट भरण्यासाठी आरिफा शेतात मजुरी करू लागल्या. दिवसाची १० किंवा २० रुपये इतकी फुटकळ मजुरी मिळायची असं त्या सांगतात. “आमचे लोक म्हणायचे, होतायत तितकी पोरं होऊ द्या, अल्ला त्यांचं पोट भरेल,” त्या सांगतात.










