“माझ्या हातात असलं तर मी कधीही त्या हॉस्पिटलात जाणार नाही.” ती ठामपणे सांगते. “आम्ही कुणी जनावर असल्यासारखं आमच्याशी वागतात सगळे. डॉक्टर तर कधीच आम्हाला तपासत नाहीत आणि नर्सेस तर काय काय म्हणतात, ‘कसे राहतात हे सगळे! कसला वास येतो त्यांच्या अंगाला, कुठून येतात कोण जाणे?’” वाराणसी जिल्ह्याच्या अनैइ गावातली सुदामा आदिवासी सांगत असतात. त्यांची पाचही बाळंतपणं घरीच पार पडली. ती का आणि कशी त्याबद्दल त्या सांगतात.
गेल्या १९ वर्षांत सुदामांना नऊ अपत्यं झाली. आज त्यांचं वय ४९ आहे आणि त्यांची पाळी अजून गेलेली नाही.
बारागाव तालुक्यातल्या या गावात अगदी टोकाला मूसाहार समुदायाची ५७ घरं आहेत तिथे त्या राहतात. जवळच ठाकूर, ब्राह्मण आणि गुप्ता या वरच्या मानलेल्या जातीतली घरं आहेत. काही मुस्लिम कुटुंबं आणि काही दलितांची घरं आहेत. या समुदायाबद्दल अनेक पूर्वग्रह आहेत आणि तेच या वस्तीत आल्यावर दिसू लागतात. उघडीनागडी, धुळीने माखलेली पोरं, तोंडाला खरकटं लागलेलं आणि त्याभोवती घोंघावणाऱ्या माश्या. स्वच्छतेचा लवलेशही नाही. पण थोडं उकलून पाहिलं तर मात्र वेगळंच चित्र समोर येतं.
उत्तर प्रदेशात अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट असलेले मूसाहार पिकांची नासधूस करणारे उंदीर धरण्यात पटाईत होते. कालांतराने त्यांचा व्यवसाय कलंक मानला जाऊ लागला आणि त्यांना उंदीरखाऊ – मूसाहार म्हणून ओळखलं जाऊ लागलं. बाकीच्या जातीचे लोक या समाजाशी मानहानीकारक वागतात, सरकारकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आलं आहे आणि आज हा समाज वंचनात राहत आहे. शेजारच्या बिहार राज्यात त्यांची गणना महादलित प्रवर्गात केली आहे. अनुसूचित जातींमधल्या सगळ्यात गरीब आणि सर्वात जास्त भेदाभेद सहन करणाऱ्या जाती महादलित म्हणून ओळखल्या जातात.








