गाढ झोप शीला वाघमारेंसाठी गतस्मृती झाली आहे.
“मला रातभर झोपच लागत नाही... किती तरी वर्षं झाली,” ३३ वर्षांच्या शीला वाघमारे सांगतात. जमिनीवरच्या गोधडीवर बसलेल्या शीलाताईच्या दुःखाची किनार डोळ्याच्या लाल कडांमधून दिसून येतीये. रात्रभर कसा त्रास होतो हे सांगत असताना दाबून टाकलेल्या हुंदक्यांनी त्यांचं अंग हलत राहतं. “रातभर रडू येतं... असं वाटतं श्वास कोंडतोय.”
बीड जिल्ह्यात बीड शहरापासून सुमारे १० किलोमीटरवर असलेल्या राजुरी घोडका गावाच्या वेशीवर शीलाताईचं घर आहे. विटामातीच्या दोन खोल्यांमध्ये त्यांचा संसार आहे. रात्री त्यांना रडू यायला लागतं आणि कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी हुंदक्यांच्या आवाजाने तिचा नवरा माणिक आणि मुलं, कार्तिक, बाबू आणि ऋतुजा जागे होतात, त्या सांगतात. “माझ्या रडण्याने त्यांची झोप मोडते. म्हणून मग मी डोळे घट्ट बंद करून घेते आणि झोपायचा प्रयत्न करते.”
पण झोप काही येत नाही. डोळ्यातलं पाणी खळत नाही.
“मला सतत दुःखी वाटतं, मनाला चिंता लागून राहते,” शीलाताई म्हणते. जरा थांबून ती बोलू लागते तेव्हा जरा वैतागल्यासारखी वाटते. “पिशवी काढली आणि हा सगळा त्रास सुरू झाला. माझी सगळी जिंदगीच पार बदलून गेली.” २००८ साली वयाच्या फक्त २० व्या वर्षी तिची गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांना अनेक त्रास जडले आहेत. आतून कोलमडून जावं इतकं दुःख, रात्रभर डोळ्याला डोळा नाही, मधूनच विनाकारण चिडचिड आणि खूप काळ टिकून राहणाऱ्या दुख्या.















