रानातल्या पावसाची ही गाणी पुणे जिल्ह्याच्या लवार्डे गावातल्या अनुसुयाबाई पांदेकर आणि त्यांच्या सूनबाई मंदा पांदेकर यांनी आठवून आठवून गायली आहेत. जात्यावरच्या ओव्या प्रकल्पासाठी २०१७ च्या एप्रिलमध्ये या ओव्या ध्वनीमुद्रित करण्यात आल्या.
२० वर्षांपूर्वी त्यांनी किती तरी ओव्या गायल्या होत्या याची आम्ही जेव्हा अनुसुयाबाईंना आठवण करून दिली तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या, “तेव्हाचे दिवस.... आता पार बदलून गेलंय सगळं.” पदराच्या काठाने त्यांनी डोळे टिपले. तेव्हा त्या तारुण्यात होत्या आणि आता सत्तरीला टेकलेल्या, विधवा. जात्यावरच्या ओव्या प्रकल्प सुरू करणारा चमू ६ जानेवारी १९९६ रोजी पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या लवार्डे गावी गेला होता आणि त्यांनी अनुसुयाबाई आणि इतरही अनेक बायांनी गायलेल्या ओव्या गोळा केल्या होत्या.
ओव्यांच्या या संग्रहात १ लाख १० हजारांहून जास्त ओव्या आहेत. आता हा सगळा संग्रह पारीवर सादर करण्यात येतोय. आणि आता याच प्रकल्पाचा पुढचा टप्पा म्हणून आम्ही या सगळ्या कलावंतांना परत एकदा भेटून त्यांची छायाचित्रं घेतोय, त्यांच्या आवाजात परत या ओव्या ध्वनीमुद्रित करतोय.
या संपूर्ण संग्रहात अनुसुयाबाई पांदेकरांनी गायलेल्या ४५ ओव्या आहेत. यातल्या फक्त सीतेच्या आयुष्यावरच्या नऊ ओव्याच १९९६ मध्ये जात्यावरच्या ओव्या चमूने रेकॉर्ड केल्या होत्या. त्यांनी गायलेल्या इतर ओव्या लिहून घेतलेल्या आहेत. आईला तिच्या मुलाविषयी वाटणारी काळजी, बायांची आयुष्यं, श्रम आणि समाजात तिची असलेली ओळख, श्रीकृष्ण आणि मारुती अशा अनेक विषयांवरच्या ओव्यांची ध्वनीमुद्रणं मात्र नाहीत. येत्या काळात या ओव्यादेखील ध्वनीमुद्रित करता येतील अशी आम्हाला आशा आहे.
आम्ही ३० एप्रिल २०१७ रोजी लवार्ड्याला गेलो आणि अनुसुयाबाईंची ही पावसाची गाणी ध्वनीमुद्रित केली. त्यांच्या सूनबाई, मंदा पाडेकर पण बसल्या आणि त्यांनी पुढाकार घेत ओव्या गायल्या. त्या गावात लग्न असेल तर लग्नात आणि हळदीच्या कार्यक्रमात गायला जातात.





