“मी जे काही शाळेत शिकते ना ते आणि माझ्या घरची परिस्थिती एकदम विरुद्ध आहे.”
प्रिया पर्वतराजींमधल्या उत्तराखंड राज्यातली, राजपूत समाजाची १६ वर्षांची मुलगी आहे. पाळी सुरू असताना तिला काय काय बंधनं पाळावी लागतात त्याबद्दल ती सांगते. “अगदी दोन वेगळ्या जगात राहत असल्यासारखं वाटतं. घरी पाळीच्या दिवसात मला सगळ्यांपासून वेगळं रहावं लागतं, सगळ्या प्रथा आणि बंधनं पाळावी लागतात. आणि शाळेत मात्र मला शिकवतात की स्त्री पुरुष समान आहेत,” ती म्हणते.
प्रिया आपल्या गावापासून सात किलोमीटरवर असणाऱ्या नानकमट्टा गावातल्या शाळेत अकराव्या इयत्तेत शिकते. ती रोज सायकलवरून येजा करते. अभ्यासू विद्यार्थिनी असणाऱ्या प्रियाने या विषयावर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. “मी पुस्तकं वाचायचे आणि मला वाटायचं की मी हे करेन, ते करेन. मी जग बदलेन, वगैरे, वगैरे. पण या प्रथांना कसलाच अर्थ नाही हे मी माझ्या घरच्यांनाच पटवून देऊ शकले नाही. मी दिवसरात्र त्यांच्यासोबत राहते तरीही मी काही त्यांना समजावून सांगू शकत नाही,” ती म्हणते.
या सगळ्या बंधनांबद्दलची चीड आणि अस्वस्थता कमी झाली नसली तरी ती आता घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागते.
प्रिया आणि तिचं कुटुंब तराई भागात राहतं. या राज्यातल्या हा सगळ्यात उंचावरचा सुपीक प्रदेश आहे (जनगणना, २०११). या राज्यात पिकांचे तीन हंगाम असतात – खरीप, रब्बी आणि झैद – इथले लोक प्रामुख्याने शेती आणि पशुपालन करतात. त्यातही जास्त करून गायी आणि म्हशी पाळतात.











