पुणे जिल्ह्यातील दापोडी गावच्या सरूबाई कडू यांनी ओव्यांच्या प्रकल्पातील सर्वात जास्त ओव्या गायल्या आहेत. त्यांची गोष्ट दोन भागांत. या पहिल्या भागात त्यांनी दुरावलेले मुलगे, कधीतरीच ज्यांचे लाड होतात अशा लेकी आणि स्वच्छंदी नवरे यांच्याविषयीच्या दहा ओव्या गायल्या आहेत.
“आता मला काहीच आठवत नाही आणि गाताही येत नाही,” सरूबाई कडू सांगत होत्या. ओसरीच्या भिंतीला टेकून बसलेल्या सरुबाईंच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती. बसल्या बसल्या त्या बोटांनी आपले गुडघे दाबत होत्या. आम्ही निराश झालो पण वाटलं थोड्या आग्रहानंतर त्या कदाचित आपलं मन बदलतीलही.
जुलैचा महिना होता; ओवी प्रकल्पाला ५००० ओव्या बहाल करणाऱ्या गायिकेला भेटण्यासाठी आम्ही पुण्यापासून ८० किलोमीटरवर दौंड तालुक्यात आलो आहोत. एका गायिकेने म्हटलेल्या ओव्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. दुसऱ्या क्रमांकावर जी आहे तिने याच्या निम्म्याच म्हटल्यात. आणि यांतील बहुतेक ओव्या सरूबाईंनी स्वत:च रचलेल्या आहेत.
१९९६ ते २००९ या काळात, सरूबाईने मुळशी तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांच्या भेटींत म्हटलेल्या या ५००० ओव्या हा प्रकल्प सुरु करणाऱ्या गटाने हाताने लिहून काढल्या होत्या आणि १,१०,००० ओव्यांच्या एकूण डेटाबेसचा हिस्सा झाल्या होत्या. आता हा प्रकल्प ‘पारी’ने हाती घेतला आहे आणि तो पुढे नेण्यासाठी नव्याने त्या गावांना भेटी देऊन त्या स्त्रियांना भेटणं, फोटो आणि व्हिडिओ घेणं असं काम चालतं. मूळगटाच्या भेटीनंतर जवळजवळ २० वर्षानी, गेल्या जुलैमध्ये आम्ही सरूबाईच्या काही ओव्या ध्वनिमुद्रित केल्या व व्हिडीओ देखील घेतले.






