अपघातात पाय गमवावा लागलेल्या २८ वर्षांच्या बिमलेश जयस्वालनी एक धाडसी निर्णय घेतला, मुंबईलगतच्या पनवेलमधल्या आपल्या भाड्याच्या घरून निघायचं आणि १२०० किलोमीटरवरच्या मध्य प्रदेशातल्या रेवा जिल्ह्यातल्या आपल्या गावी पोचायचं, तेही होंडा ॲक्टिव्हा या आपल्या दुचाकीवर. त्याच्या गाडीला जास्तीची चाकं आहेत. आपली पत्नी, २६ वर्षीय सुनीता आणि ३ वर्षांची लेक, रुबी यांना घेऊन त्याने हा प्रवास केला. “दुसरा काही पर्यायच नव्हता,” तो सांगतो.
बिमलेश पनवेलमध्ये एका कंत्राटदाराबरोबर त्याच्या हातातल्या प्रकल्पांवर काम करायचा – घरं बांधून झाली की ती साफसुफ करायची. “एका पायाने काहीही करायचं म्हटलं तर मुश्किलच आहे, पण आता जे आहे ते करायला तर लागणारच,” रेवा जिल्ह्यातल्या आपल्या होनौती गावातल्या आपल्या घरून त्याने मला फोनवर सांगितलं. या हिकमतीच्या जोरावरच त्याने हा थक्क करणारा प्रवास केला, तोही पारा कधी कधी ४० अंशाच्या वर गेला असताना. एखाद्याची जिद्द, उमेद तर यातून दिसतेच – पण सोबतच त्यांच्यासारख्या स्थलांतरित कामगारांची घरी परतण्यासाठीची धडपडही कळून येते.
कोरोना विषाणूचा पैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली आणि रोजंदारीवर काम करणारे बिमलेशसारखे लाखो कामगार गर्तेत सापडले. “आम्हाला कामच नव्हतं, त्यामुळे रोजचं खाणं कसं मिळवायचं हेही आम्हाला माहित नव्हतं,” तो सांगतो. “घरभाडं आणि विजबिल भरणं तर दूरचीच गोष्ट. फक्त चार तासांची सूचना देऊन कुणी तरी देश बंद करतं का?”
तरीही हे कुटुंब ५० दिवस पनवेलमध्ये कसं तरी राहिलं. “स्थानिक संस्था आम्हाला जेवण आणि धान्य देत होत्या,” बिमलेश सांगतो. “आम्ही कसं तरी भागवलं. प्रत्येक टप्प्यावर वाटायचं आता टाळेबंदी उठणार म्हणून. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता चौथा टप्पा सुरू होणार आहे म्हणून, तेव्हा मात्र वाटायला लागलं की हे असंच कायम चालू राहणार. मुंबई आणि आसपासच्या भागात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढायला लागलेत, त्यामुळे तिथे हिनौतीमध्ये घरच्यांनाही काळजी लागून राहिली होती.”





