दलित कॉलनीतल्या लोकांना टंचाई नवी नाहीये. १९९० च्या आधी बरेचसे पुरुष या भागातल्या गावांमध्ये वेठबिगारीवर काम करत होते. सध्याची परिस्थिती त्यांना त्या दिवसांची आठवण करून देतीये. “ही [नोटांबंदीने आणलेली] टंचाई ३० वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळाच्या मानाने बरीच म्हणायची,” पन्नाशीला टेकलेले नारायणप्पा सांगतात. “मी विशीत असताना आम्हाला सलग ३-४ दिवस उपाशी रहावं लागे. आम्ही चिंचोके पाण्यात भिजवून ते खायचो, किंवा माडाच्या झाडाचे कंद खाऊन पोटाला आधार शोधायचो. त्या काळात मी १४ वर्षं जीथागडू (वेठबिगार) म्हणून काम केलंय.”
आता हे पूर्वी वेठबिगार असणारे कामगार वर्षाचा बराच काळ कामाच्या शोधात गावं सोडून बाहेर पडतात. गावातल्या शेतीतली मजुरी कमी झाल्यामुळे तर हे प्रमाण जास्तच आहे. नारायणप्पांचं बहुतेक सगळं कुटुंब कामाच्या शोधात बंगळुरूला जातं, आणि दर ३-४ महिन्यांनी थोड्या दिवसांसाठी गावी परततं. ते शक्यतो शहरात बांधकामांवर मजुरी करतात आणि त्याच बांधकाम चालू असणाऱ्या इमारतीच्या गच्चीवर किंवा रस्त्याच्या कडेने अतिशय छोट्या गिचमिडीच्या खोल्यांमध्ये राहतात. पण असं असलं तरी आपल्या कष्टाचं पण पोटभर जेवण ते जेऊ शकतात. “आठवड्यातून दोनदा तरी आमच्या जेवणात मटण असतंच,” नारायणप्पा सांगतात. पण नोटाबंदीनंतर मात्र हे चित्रच बदललं.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नारायणप्पांचं कुटुंब बुचरलाला परतलं, तर शेतांमध्ये कसलं कामच नाही. त्यामुळे साठवलेली जी काही पुंजी होती त्यातच सगळा खर्च भागवण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. गावातल्या इतरांची स्थिती जरा बरी म्हणायची. घरचं साठवलेलं धान्य देऊन किंवा पैशाची मदत करून ते एकमेकांना आधार देतायत. पण नारायणप्पांच्या जातबांधवांकडे मात्र धान्याचा साठाही नाही आणि इतरांकडून ते फारसे पैसेही उसने घेऊ शकत नव्हते.
“आम्ही आंबेडकरांची लेकरं आहोत,” नारायणप्पा सांगतात. उसने पैसे घेणं किंवा धान्य एकमेकांना देणं त्यांच्यासाठी का अवघड आहे हेच यातून नारायणप्पा सांगायचा प्रयत्न करतात. ते शक्यतो त्यांची जात (मडिगा) उघडपणे सांगत नाहीत. तेलुगुमध्ये कधी कधी हा शब्द अवमानकारक म्हणून वापरला जातो. शिवाय, त्यांना आपल्याला मदतीची गरज आहे हे दाखवायचं नाहीये, “आता आम्हालाही मान आहे,” ते म्हणतात. “आम्हाला कुणी खाणं देऊ केलं तरी आम्ही ते घेत नाही. आम्ही एक वेळ कमी खाऊ पण सांगताना आम्ही हेच म्हणणार की आम्ही पोटभर जेवलो आहोत.”