“माझा नवरा शनिवारी दारूच्या या एवढाल्या तीन बाटल्या विकत घेतो,” मोठा हात पसरून कनका सांगते. “पुढचे दोन तीन दिवस ती दारू प्यायची आणि मग बाटल्या रिकाम्या झाल्या की कामावर जायचं. घरात खायला कधीच पुरेसा पैसा नसतो. मी कसं तरी करून माझं आणि माझ्या पोराचं पोट भरतीये. आणि माझ्या नवऱ्याला आणखी एक मूल हवंय. नको जीव झालाय!” हताश होऊन ती म्हणते.
कनका (नाव बदललं आहे) बेट्टा कुरुंबा आदिवासी आहे. २४ वर्षांची एक मुलाची ही आई गुडलुर आदिवासी रुग्णालयात डॉक्टरांकडे आली होती. उदगमंडलम किंवा उटीहून ५० किलोमीटरवर असणारं, गुडलुर गावातलं ५० खाटांचं हे रुग्णालय तमिळ नाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातल्या गुडलुर आणि पंथलुर तालुक्यातल्या १२,००० हून अधिक आदिवासी लोकसंख्येला आरोग्य सेवा देतं.
किरकोळ बांध्याची, विटलेलं पातळ नेसलेली कनका, तिच्या एकुलत्या एक मुलीसाठी दवाखान्यात आलीये. इथून १३ किलोमीटरवर असणाऱ्या तिच्या पाड्यावर गेल्या महिन्यात नियमित तपासणी झाली तेव्हा रुग्णालयाशी संलग्न असोसिएशन फॉर हेल्थ वेलफेअर इन द निलगिरीज (अश्विनी) संस्थेच्या आरोग्य कार्यकर्तीने कनकाच्या मुलीचं वजन केलं होतं. दोन वर्षांची या मुलीचं वजन केवळ ७.२ किलो भरलं (जे खरं तर १०-१२ किलो असायला हवं) तेव्हा ती कार्यकर्तीही चिंतित झाली कारण इतकं कमी वजन म्हणजे तिला अतितीव्र कुपोषण होतं. मग तिने कनकाला मुलीला घेऊन ताबडतोब दवाखान्यात यायला सांगितलं होतं.
मुलगी कुपोषित आहे यात काय नवल? कनकाला ज्या प्रकारे पैशाची काटकसर करावी लागते ते पाहता त्यात काहीच आश्चर्य नाही. तिचा नवरा, जो स्वतः विशीतच आहे, आठवड्यातले काही दिवसच काम करतो. जवळपासच्या चहा, कॉफी, मिरीच्या मळ्यात, केळीच्या बागात त्याला रोजंदारीवर काम मिळतं आणि दिवसाला तो ३०० रुपये कमवू शकतो. “तो मला अन्नधान्यासाठी महिन्याला फक्त ५०० रुपये देतो,” कनका सांगते. “तेवढ्या पैशात मला सगळ्या घरासाठी स्वयंपाक करावा लागतो.”
कनका आणि तिचा नवरा त्याची आत्या आणि तिच्या यजमानांबरोबर राहतात. पन्नाशीत असणारे ते दोघंही रोजंदारीवर मजुरी करतात. अख्ख्या कुटुंबाकडे मिळून दोन शिधा पत्रिका आहेत, ज्यावर त्यांना दर महिन्याला ७० किलो मोफत तांदूळ, दोन किलो डाळ, दोन किलो साखर, दोन किलो तेल स्वस्त भावात मिळायला हवं. “कधी कधी तर माझा नवरा दारू विकत आणण्यासाठी रेशनचा तांदूळही विकून येतो,” कनका सांगते. “कधी कधी तर घरात अन्नाचा कणही नसतो.”











