तिला फक्त तिचं नाव लिहिता आणि वाचता येतं. लक्ष देत, घोटून ती देवनागरीत आपलं नाव लिहिते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा अभिमान लपत नाहीः गो-प-ली. आणि मग त्याच चेहऱ्यावर हसू उमलतं, हास्याच्या लकेरीच, सगळ्यांना हसवणाऱ्या.
चार पोरांची आई असलेली ३८ वर्षांची गोपली गमेती म्हणते की बायांनी जर मनावर घेतलं ना तर त्या काय वाटेल ते करू शकतात.
उदयपूर जिल्ह्याच्या गोगुंदा तालुक्यात करदा गावाच्या वेशीबाहेर असलेल्या अगदी तीसच घरांच्या वस्तीत गोपली राहते. तिची चारही मुलं घरीच जन्मली आहेत, सोबतीला तिच्या समाजाच्या काही बायका. तिने आयुष्यात पहिल्यांदा दवाखाना पाहिला तो चौथ्या बाळंतपणानंतर. तिची तिसरी मुलगी जन्मली आणि त्यानंतर नसबंदी करण्यासाठी ती दवाखान्यात गेली होती.
“आता आपलं कुटुंब पूर्ण झालं असं म्हणण्याची वेळ आली होती,” ती म्हणते. गोगुंदा सामुदायिक आरोग्य केंद्रातली एक आरोग्य कार्यकर्ती घरभेटीसाठी आली असताना तिने आणखी मुलं नको असतील तर “ऑपरेशन” करून घेण्याचा सल्ला देऊन गेली होती. खर्चही काहीच नव्हता. तिला फक्त एकच गोष्ट करायची होती. तीस किलोमीटरवर असलेल्या सामुदायिक आरोग्य केंद्रात पोचायचं होतं. चार प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेत येणाऱ्या गावांना या आरोग्य केंद्रातर्फे आरोग्यसेवा देण्यात येतात.
तिने किती तरी वेळा घरी हा विषय काढून पाहिला, पण तिच्या नवऱ्याने काहीच लक्ष दिलं नाही. पुढचे काही महिने तिने मनाशी आपला निर्धार पक्का केला. मुलगी अंगावर पीत होती आणि गोपली मनाशीच विचार करत होती की आपण घेतलेला निर्णय आपण तडीस नेऊ शकणार का नाही.













