देबोहाला जन्माला आले तेव्हा आकाशाच काळे ढग दाटून आले होते. म्हणून त्यांच्या आई-वडलांनी छोट्या बाळाचं नाव ठेवलं 'देबोहाला'. चकमा भाषेत याचा अर्थ होतो भरून आलेलं आभाळ. या काळोखाने देबोहालांची साथ आयुष्यभर सोडली नाही. तीन वर्षांचे असताना त्यांना कांजिण्या झाल्या आणि त्यानंतर खूप तीव्र जुलाब झाले. त्यातून रातांधळेपणा आला आणि हळूहळू त्यांची दृष्टी लोप पावत गेली.
पण देबोहाला या सगळ्यामुळे विचलित झाले नाहीत. वयाच्या १६ व्या वर्षी ते बांबूच्या सुंदर टोपल्या करायला शिकले. आणि आज वयाच्या ६५ व्या वर्षी ते म्हणतात, “बांबूच्या पट्ट्या विणून त्याच्यापासून वेगवेगळे आकार, नक्षी कशी करायची ते माझा मी शिकलो. तरुण होतो तेव्हा तर बांबूचं अख्खं घर बांधण्याची शक्ती माझ्यात होती.”
देबोहाला मिझोरामच्या मामित जिल्ह्यातल्या झॉलनुम तालुक्यातल्या राजीवनगरमध्ये राहतात. हे ३,५३० लोकसंख्येचं गाव आहे. ते चकमा या अनुसूचित जमातीचे आहेत. अनेक चकमा बौद्ध धर्माचं अनुपालन करतात आणि बहुतेक जण शेती करून गुजराण करतात. या जिल्ह्यातल्या डोंगरउतारांवरची माती सुपीक असून अनेक जण झूम किंवा फिरती शेती करतात. मका, तांदूळ, तीळ, सुपारी अननस आणि इतर पिकं इथे घेतली जातात. या भागात बांबूची घनदाट जंगलं आहेत आणि या भागातल्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कुंच्यांसाठी लागणाऱ्या शिंदीची बनं आहेत.




