“मी आणि माझं बाळ जगू, याची खात्रीच वाटत नव्हती मला त्या दिवशी दुपारी. पाणमोट फुटली होती माझी आणि दूरदूरपर्यंत रुग्णालय दिसत नव्हतं. कोणी आरोग्य सेवकही नव्हता. सिमल्याच्या रुग्णालयात जाण्यासाठी जीपमध्ये बसले आणि मला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. माझ्या हातात काहीच उरलं नव्हतं. तिथेच, बोलेरोच्या मागच्या सीटवर मी माझ्या बाळाला जन्म दिला.” हे सांगतानाही अनुराधा महातोच्या (नाव बदललं आहे) चेहर्यावर तेव्हाची भीती आणि ताण दिसत होता. या घटनेनंतर सहा महिन्यांनी, एप्रिल २०२२ मध्ये मी तिला भेटले, तेव्हाही जे घडलं, ते बारीकसारीक तपशीलासह तिला आठवत होतं. बाळाला मांडीवर घेऊन पंचविशी ओलांडलेली अनुराधा माझ्याशी बोलत होती.
“दुपारचे तीन वाजले असतील. पाणी जायला लागलं तेव्हा माझ्या नवर्याने आशा दीदीला सांगितलं. पुढच्या पंधरा-वीस मिनिटांतच ती आली. तिने फोन केला, ॲम्ब्युलन्स बोलावली. ॲम्ब्युलन्सचे कर्मचारी म्हणाले की आम्ही दहा मिनिटांत निघतो. ते निघालेही असतील, पण आमच्या घरी पोहोचायला त्यांना नेहमीपेक्षा किमान एक तास जास्त लागला असता. कारण त्या दिवशी प्रचंड पाऊस पडत होता,” पावसाळ्यात इथले रस्ते किती धोकादायक होतात ते अनुराधा सांगते.
हिमाचल प्रदेशातल्या कोटी गावात पत्र्याच्या झोपडीत ती नवरा आणि तीन मुलांसह राहाते. नवरा बांधकामावर गवंडीकाम करतो. हे कुटुंब मूळचं बिहारचं. भागलपूर जिल्ह्यातलं गोपालपूर हे त्यांचं गाव.
अनुराधा २०२० मध्ये कोटी गावात (जिल्हा : सिमला, तालुका : मशोबरा) नवर्याकडे आली. “आर्थिक अडचणीमुळे आम्हाला गाव सोडावं लागलं. दोन दोन ठिकाणचं भाडं भरणं जड जायला लागलं होतं.” अनुराधाचा नवरा, ३८ वर्षांचा राम महातो (नाव बदललं आहे) गवंडी आहे. जिथे बांधकामं होतात आणि त्याला काम मिळतं, तिथे त्याला जावं लागतं. आता त्यांच्या पत्र्याच्या झोपडीच्या बरोबर समोर त्याचं काम सुरू आहे.
एरवीही त्यांच्या घरापर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचणं कठीणच असतं. तीस किलोमीटरवर सिमल्याला कमला नेहरू रुग्णालय आहे. तिथून ॲम्ब्युलन्स येणार असली तर ती कोटीला पोहोचायला दीड ते दोन तास घेते, पाऊस किंवा बर्फ पडला तर त्याच्या दुप्पट वेळ!










