‘अखेरचे शिलेदार’ या माझ्या पुस्तकात ज्यांची जीवनकहाणी मी लिहिली त्यातल्या हयात असलेल्या मोजक्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक म्हणजे थेलू महातो – थेलूदादू. गुरुवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातल्या पिर्रा गावी आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर हे जग सोडून गेलेले ते पहिले. १९४२ साली पुरुलियातल्या १२ पोलिस ठाण्यांवर मोर्चे निघाले. आज कुणाच्या गणतीतही नसलेल्या या आंदोलनातले हयात असलेले ते एकटेच होते, कदाचित. थेलूदादूंचं वय १०३ किंवा १०५ वर्षं असावं.
थेलूदादू गेले आणि स्वराज्यासाठी लढलेली, भारत एक स्वतंत्र देश व्हावा म्हणून झटलेली ही सोनेरी पिढी अस्तंगत होणार याची जाणीव अधिक गडद झाली. पुढच्या पाच-सहा वर्षांनंतर या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लढलेली एकही व्यक्ती हयात नसेल. तरुणांना, नव्या पिढीला एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाला पाहता येणार नाही, त्यांचे अनुभव ऐकता येणार नाहीत, त्यांच्याशी बोलताही येणार नाही. ही माणसं कोण होती, ती का लढली, कशासाठी लढली हे त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधीच आता मिळणार नाही.
थेलू महातो आणि त्यांचे आयुष्यभराचे साथी लोक्खी महातो आपल्या या गोष्टी सांगायला किती उत्सुक होते. आपल्या देशासाठी ते लढले आणि त्या गोष्टीचा त्यांना अभिमान होता हे नव्या तरुणाईला कळावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. थेलूदादू त्यांची ही गोष्ट आता स्वतः सांगू शकणार नाहीत. आणि खरं तर पुढच्या ५-६ वर्षांत या स्वातंत्र्यसैनिकांपैकी कुणीच हे करू शकणार नाही.
ही नवी पिढी आणि तरुणाई किती मोठ्या ठेव्याला मुकते आहे आणि आता आपणसुद्धा किती तरी गोष्टी कधीच समजून घेऊ शकणार नाही ही जाणीव दुःखद आहे. थेलूदादूंसारख्या अनेकांबद्दल, त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल आपल्याला किती कमी माहित आहे! आणि खरं तर त्यांच्या कहाण्या आपलं पुढे काय होणार हे ठरवण्यासाठी किती मोलाच्या आहेत हे समजलं की आपण काय गमावलंय हे लक्षात येतं.
आज इतिहासाची मोडतोड केली जात असताना, चक्क खोटा, कपोलकल्पित इतिहास आपल्यावर थोपवला जात असताना तर ही हानी फार मोठी आहे. जनमानसात, मोठ्या प्रमाणावर माध्यमांमध्ये आणि सर्वात भयानक म्हणजे शालेय पुस्तकांमध्ये मोहनदास करमचंद गांधी या महात्म्याच्या खुनाबद्दलची काही कळीची सत्यं पुसून टाकण्याचं काम जोमाने सुरू आहे.






