सततच्या फोनकॉल्सना कंटाळून अखेर प्रमोद कुमार राजी झाले. “तुमचा आधार क्रमांक सांगा, नाही तर तुमचा नंबर बंद होईल,” फोन करणारी व्यक्ती सांगायची.
२०१८ च्या सुरुवातीच्या सहा महिन्यात कुमार यांच्या दादेवरा गावात अशा फोन कॉल्सचं पेव फुटलं होतं. याआधी तीन वर्षं ओळख पटवण्याचे कोणतेही सोपस्कार न करता त्यांनी फोन वापरला होता. तरीही २०१८ च्या मध्यावर कधी तरी ते चार किलोमीटर सायकल मारत पारसदा मार्केटमधल्या एका सिम कार्ड विक्रेत्याच्या दुकानात पोचले. “काहीही प्रश्न विचारले नाहीत. दुकानदाराने माझं आधार कार्ड घेतलं आणि एका छोट्याशा काळ्या यंत्रावरचं बटन दोनदा दाबायला सांगितलं. मला माझा फोटो कंप्यूटरच्या स्क्रीनवर दिसला. त्यानं मला सांगितलं की माझं सिम कार्ड आधीसारखंच चालू राहील,” कुमार सांगतात.
असं सगळं सुरळित पार पडलं, कुमार यांचा पगार मात्र गायब झाला.
अगदी २००५ मध्ये दूरसंचार खात्याने सिम कार्डधारकांची ओळख पटवण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं, त्यांच्या म्हणण्यानुसार...‘ही काळजी करण्याची बाब [असून] सुरक्षेवर विपरित परिणाम होऊ शकतात.’ २०१४ मध्ये या विभागाने यात फेरबदल केला – आता ग्राहकाला आपला आधार क्रमांक द्यावा लागणार होता.
जानेवारी २०१७ मध्ये पेमेंट्स बँक उघडणारी एयरटेल पहिली मोबाईल सेवा पुरवठा करणारी कंपनी ठरली. त्यांच्या वेबसाइटवर ‘प्रत्येक भारतीयाला समान, प्रभावी आणि विश्वसार्ह बँकिंग अनुभव’ देण्याचा वादा करण्यात आला.
सीतापूर जिल्ह्याच्या या गावामध्ये मात्र या सगळ्या घडामोडींमुळे छोटे शेतकरी आणि मजूर असणाऱ्या ३३ वर्षीय कुमार यांचं आयुष्यच उलटं पालटं करून टाकलं. ते आणि त्यांच्या घरचे अनेक जण एयरटेलची सिम कार्डं वापरत होते.





