शिवानी कुमारी केवळ १९ वर्षांची आहे, पण तिला वाटतं की तिच्याकडे आता फारसा वेळ राहिलेला नाही.
गेली चार वर्षं तिने घरच्यांना आपलं लग्न ठरवण्यापासून अडवलं होतं – पण आता तिला वाटतंय हे सुख फार काळ उपभोगता येणार नाही. "त्यांना अजून किती काळ रोखू शकेन, माहीत नाही," ती म्हणते. "हे कधी तरी संपेलच."
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील गंगसारा या तिच्या गावात मुलींचं इयत्ता १०वी पूर्ण होण्याआधीच किंवा १७-१८ वर्षांच्या आतच लग्न लावण्यात येतं.
शिवानी (या कहाणीतील सगळी नावं बदलली आहेत) अजून तटून आहे, आणि ती बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात आहे. कॉलेजला जावं असं तिला नेहमीच वाटायचं, पण आपण एवढे एकटे पडू याची तिला कल्पना नव्हती. "गावातल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींचं लग्न झालंय. मी ज्या मुलींसोबत लहानाची मोठी झाले अन् शाळेत गेले त्या सगळ्या निघून गेल्या," ती म्हणते. आम्ही एका दुपारी शेजारच्या घरी बोलत होतो कारण तिला स्वतःच्या घरी मोकळेपणाने बोलता आलं नसतं. इथेही आम्ही घरच्या शेळ्या विसावल्या होत्या त्या पडवीत बोलावं असा तिचा आग्रह होता. "कोरोनात कॉलेजमधल्या माझ्या शेवटच्या मैत्रिणीचं लग्न झालं," ती म्हणते.
ती म्हणते की तिच्या समाजात मुलींना कॉलेजला जाण्याची संधी क्वचितच मिळते. शिवानी ही रविदास (चमार जातीची एक पोटजात) या महादलित समाजाची आहे – २००७ मध्ये बिहार शासनाने २१ अत्यंत मागासलेल्या अनुसूचित जातींना एकत्रितपणे ही संज्ञा दिली होती.
अविवाहित असल्याचं सामाजिक लांच्छन आणि घरचे, शेजारचे व नातेवाइकांकडून सतत लग्न करण्याचा दबाव यामुळे तिचा एकटेपणा आणखी वाढला आहे. "बाबा म्हणतात पुरे झालं शिक्षण. पण मला पोलिस ऑफिसर व्हायचंय. त्यांना वाटतं मी इतकं मोठं स्वप्न पाहू नये. ते म्हणतात मी शिकतच राहिले तर माझ्याशी लग्न कोण करेल?" ती म्हणते. "आमच्यात तर मुलांचंही लवकर लग्न होतं. कधी कधी मला वाटतं मी पण राजी व्हावं, पण मी इथपर्यंत आले आहे अन् मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे."







