“माझ्या आयुष्याची कहाणी सांगतीये, तितका विश्वास ठेवू ना?”
याहून अधिक थेट आणि आव्हानात्मक प्रश्न क्वचितच तुम्हाला विचारला जातो. अर्थात हा विचारणाऱ्या मैत्रिणीकडे तशी कारणंही होतीच. तमिळ नाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातल्या कुणाला फारशा माहित नसलेल्या या गावातली जननी स्वतःच्या आयुष्याबद्दल म्हणते तसं, “टीबीने सगळंच बदलून टाकलं.”
टीबी झाला तेव्हा तिच्या लग्नाला साडेचार वर्षं झाली होती, तिचा तान्हा चार महिन्यांचा होता. “२०२० साली मे महिन्यात लागण झाली त्या आधी महिनाभर मला लक्षणं जाणवत होती [चिवट ताप आणि खोकला].” नेहमीच्या कुठल्याच तपासण्यांमधून काहीच कळत नाही म्हटल्यावर डॉक्टरांनी तिला टीबीची टेस्ट करायला सांगितलं. “जेव्हा त्यांनी टीबीचं निदान पक्कं केलं, तेव्हा मी कोसळलेच. माझ्या ओळखीतल्या कुणालाच हा आजार झाला नव्हता. आणि मला होईल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती.”
“माझ्या गावात हा आजार म्हणजे कलंक मानला जातो. एकदा झाला की सगळ्या भेटीगाठी बंद – आणि मलाच तो झालाय!”
त्या दिवसापासून २७ वर्षीय जननीचा, एके काळी तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिच्या आजारावरून सारखा तिला टोमणे मारायला लागला, तिच्यामुळे त्याला बाधा होऊ शकेल म्हणू लागला. “तो मला शिव्या द्यायचा, मारायचा. आमचं लग्न झालं त्यानंतर वर्षाच्या आत माझी सासू वारली – त्यांना पूर्वीपासून किडनीचा आजार होता, त्यामुळे. पण माझा नवरा म्हणायला लागला की माझ्यामुळेच त्या गेल्या.”
खरं तर त्या काळात जिवाला धोका असणारी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे जननी.
भारतामध्ये संसर्गजन्य आजारांपैकी सगळ्यात जीवघेणा आजार आजही क्षयरोग किंवा टीबीच आहे.










