"या मुलुखात राष्ट्रपतींना सुद्धा खायला रोटी पाहिजे. तुमच्याकडे कितीही पैसा का असेना. शेवटी तुम्ही पैसा नाही, रोटीच खाणार ना?" सिकंदर गुलाम नबी शेख म्हणाले. "अन् खायला कोण देणार?" त्यांनी विचारलं.
शेख, ३६, डोंबिवलीतील एक ऑटोरिक्षा चालक आहेत. रविवार, २५ नोव्हेंबर २०१८ रोजी, त्यांनी कल्याण-डोंबिवलीमधील (मध्य मुंबईतील दादरहून ४५ किमी दूर) आपल्या सहकाऱ्यांसोबत भारतभरातील शेतकऱ्यांना शहरी लोकांचा पाठिंबा मिळावा म्ह्णून एक याचिका मोहीम सुरु केली.
सगळे चालक डोंबिवली (पूर्व) स्थानकाबाहेर सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान रामनगर रिक्षा स्टँडजवळ आणि संध्याकाळी ४ ते ९ दरम्यान मुख्य रिक्षा स्टँडजवळ येऊन जमले. ७-८ रिक्षा चालक, त्यांचे मित्र आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या एका तुकडीने संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करणारा "नेशन फॉर फार्मर्स" चा फलक लावला. इतर लोक एका टेबलावर बसून हिंदी, इंग्रजी आणि मराठीत पत्रकं आणि याचिकांच्या प्रती घेऊन वाटत होते. देशाच्या राष्ट्रपतींना उद्देशून असलेल्या या याचिकेत, देशातील शेतीवरचं अरिष्ट तसेच इतर श्रमिक गटांच्या वाढत्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचं एक विशेष अधिवेशन आयोजित करण्याची मागणी केली आहे.
डोंबिवली स्थानक मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वेमार्गावर आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यात रेल्वेनं प्रवास करण्यासाठी दररोज हजारो प्रवाशी या स्थानकात ये-जा करतात. अनेक उपनगरीय स्थानकांप्रमाणेच डोंबिवली स्थानकाच्या बाहेर कपडेलत्ते, स्टेशनरी आणि अशा बऱ्याच वस्तू विकणारी दुकानं उभी राहताहेत. बँका, ए.टी.एम. आणि झेरॉक्सची दुकानं आहेत. रस्त्याच्या कडेला फेरीवाले मोबाईलची कव्हर्स, फळं, भाज्या आणि इतर अनेक वस्तू विकत असतात. इथे चहाच्या टपऱ्या आणि शिकवणी वर्ग सुद्धा आहेत.
या गडबड गोंधळात लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल, तर त्यांना सांगायला तुमच्याकडे काहीतरी महत्त्वाचं असावं लागतं.








