घराबाहेरच्या पलंगावर बसलेली ४० वर्षांची मालन आई घरी येण्याची वाट पाहतीये. फुला-फुलाचं अंगभर पोलकं आणि खाली परकर, आणि डोळ्यात ओळख. मालन हसली. “आई नाही घरी,” तिनं मला सांगितलं. आणि मी दगड विटांच्या त्यांच्या ऐसपैस घराच्या पायरीवर बैठक मारली.
मालन मोरे वाडी गावात राहते, आई, ६३ वर्षांच्या राहीबाई आणि वडील, ८३ वर्षांच्या नानांसोबत (गाव आणि व्यक्तींची नावं बदलली आहेत). पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या या गावात या कुटुंबाची दोन-तीन एकर शेती आहे ज्यात ते गहू, तांदूळ आणि भाज्या घेतात.
वयाच्या १८ व्या वर्षी पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात तपासणी झाली आणि मालनला ‘सौम्य मतिमंदत्व’ असल्याचं निदान झालं.
पण त्या आधी १२ वर्षं ती गावातल्या सरकारी प्राथमिक शाळेत गेलीये. “बाकीची पोरं पार चौथी पास होईन पुढे गेली, तरी ही फक्त फरशीवर रेघा काढायची,” राहीबाई सांगतात. “शेवटी शाळेच्या बाईंनीच नाव काढून घ्यायला सांगितलं.” तेव्हा मालन १५ वर्षांची असेल.
मग तेव्हापासून घरीच आईबरोबर काही ना काही करत रहायचं हा मालनचा दिनक्रम. मनात आलं तर आईला मदत करायची नाही तर नाही. ती फारसं बोलत नाही. बोलली तर फक्त आईशी आणि बाकी काही लोकांशी. पण तिला समजतं आणि ती संवाद साधू शकते. मी तिच्याशी बोलले, तेव्हा ती हसली, तिने मान डोलावली आणि थोडं फार बोललीसुद्धा.








