“काय सांगायचं तुला, कंबरेचा काटा मोडलाय, आणि छातीचा हुंडा पुढे आलाय,” बिबाबाई त्यांच्या अवस्थेचं चपखल वर्णन करतात. “ओटीपोटच राहिलं नाहीये, पाठपोट एक झालंय. दोन तीन वर्षांपासून हे असंच आहे. डॉक्टर म्हणतात, हाडं पोकळ झालीयेत,” बिबाबाई शून्यात पाहत म्हणतात.
डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही अशा अंधाऱ्या स्वयंपाकघरात आम्ही बसलो होतो. मुळशी तालुक्याच्या हडशी गावातलं त्यांचं नीट बांधलेलं, सहा खणाचं, पोटमाळा, ओसरी आणि पडवी असलेलं त्यांचं घर. घराच्या बाहेर पत्र्याची शेड असलेलं छोटंसं स्वयंपाकघर. बिबाबाई चुलीवर आदल्या रात्रीचा भात परतत होत्या. त्यांनी मला बसायला पाट दिला. आणि मग, जेव्हा सगळी भांडी गोळा करून त्या शेजारच्याच मोरीवर न्यायला म्हणून उठल्या तेव्हा नीट लक्षात आलं की बिबाबाई कंबरेतून पूर्ण वाकलेल्या आहेत. वाकल्या म्हणजे किती तर डोकं गुडघ्याला टेकेल इतक्या. उकिडवं बसल्या तर गुडघे कानाला चिकटतील इतक्या.
ठिसूळ झालेली हाडं आणि गेल्या २५ वर्षांत झालेली चार मोठ्या शस्त्रक्रियांचा हा परिणाम. नसबंदी, हर्निया, गर्भाशय काढण्याची आणि आणखी एक ज्यात आतड्याचा काही भाग, पोटातली चरबी आणि स्नायूदेखील काढले गेले.
“माझं लग्न लई लवकर झालं, बघ. मी नुकतीच शहाणी झाले होते. लग्नानंतर पाच वर्ष मूल नव्हतं,” बिबाबाई सांगतात. त्यांनी शाळा पाहिलीच नाहीये. त्यांचे पती महिपती लोयरे ऊर्फ अप्पा त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे आहेत. जिल्हा परिषद शिक्षक म्हणून निवृत्त झाले. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये अप्पांनी शिक्षक म्हणून काम केलंय. लोयरे कुटुंबाची थोडी फार जमीन आहे ज्यात ते भात, हरभरा आणि कडधान्यं घेतात. घरी बैलजोडी आहे, एक म्हैस, गाय आणि तिची कालवड अशी जनावरं आहेत. दुधाचा थोडा फार पैसा येतो. आणि अप्पांची पेन्शनही येते.
“माझी सगळी बाळंतपणं माहेरातच झाली,” बिबाबाई सांगतात. त्यांचा पहिला मुलगा झाला तेव्हा त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. “दिवस भरले होते, बैलगाडी जुंपून डोंगरापलिकडच्या माहेराकडे निघालो होतो. पक्का रस्ता नाही, जायला यायला वाहन नाही, काही नाही आन् गाडीतच जोरात कळा यायला लागल्या. पाणमोट फुटली. कळा थांबेनात. मग काय, तिथे गाडीतच बाळंत झाले!” बिबाबाई तेव्हाच्या आठवणी सांगतात. मायांगाला चिरा गेल्या त्यामुळे नंतर टाके घालायला लागल्याचं त्यांना आठवतं. कुठे ते मात्र ध्यानात नाही.







