अख्खा वर्ग शांत बसलाय. जीवशास्त्राच्या पुस्तकातला मानवामध्ये लिंग निर्धारित करणाऱ्या गुणसूत्रांचा विषय सुरू आहे. “मादीमध्ये दोन x गुणसूत्रं असतात. नरामध्ये एक x आणि एक y गुणसूत्र असतं. जर xx आणि एक y असा संयोग झाला तर जन्माला येणारं बाळ तिथे बसलेल्या विद्यार्थ्यासारखं होणार,” एका विद्यार्थ्याकडे निर्देश करत शिक्षक म्हणतात. अख्खा वर्ग खिदळायला लागतो. उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्याला पुरतं कानकोंडं होतं.
ट्रान्स किंवा पारलिंगी व्यक्तींनी सादर केलेल्या संदकारंग (लढ्यासाठी सज्ज) या नाटकातला हा अगदी पहिला प्रसंग. वर्गामध्ये किंवा एरवी देखील मान्य लैंगिक साच्यांमध्ये न बसल्यामुळे एखाद्या मुलाला किंवा मुलीला किती अवमान, खिल्ली, चेष्टा सहन करावी लागते हे नाटकाच्या पहिल्या अंकात दाखवण्यात आलं आहे. दुसऱ्या अंकामध्ये हिंसेचा सामना करणाऱ्या ट्रान्स स्त्रिया आणि पुरुषांच्या कहाण्या आपल्याला पहायला मिळतात.
ट्रान्स राइट्स नाऊ कलेक्टिव्ह (टीआरएनसी) भारतभरातल्या दलित, बहुजन आणि आदिवासी ट्रान्स व्यक्तींचं म्हणणं मुखर करण्यावर भर देतं. त्यांनी संदकारंगचा पहिला प्रयोग २३ नोव्हेंबर २०२२ रोजी चेन्नईमध्ये केला. एक तासाच्या प्रयोगाचं दिग्दर्शन, निर्मिती नऊ ट्रान्स साथींनी केली असून. तेच त्यात अभिनयही करतात.
“२० नोव्हेंबर हा दिवस ज्या ट्रान्स व्यक्ती मरण पावल्या आहेत त्यांच्या स्मृतीत इंटरनॅशनल ट्रान्स डे ऑफ रिमेंमबरन्स – आंतरराष्ट्रीय ट्रान्स व्यक्ती स्मृती दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यांचं जगणं सोपं नसतं. अनेकदा घरच्यांकडून त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं, समाज त्यांना वाळीत टाकतो. अनेकांचा खून पडलाय आणि कित्येकांनी आत्महत्या केली आहे, टीआरएनसीच्या संस्थापक ग्रेस बानू सांगतात.




























