कुसुमताई सोनवणे, ज्यांच्या ओव्या पारीवर सादर करण्यात आल्या आहेत (१५ मार्च २०१७), जळू जळू तरुणपण, सारा दोष उभारीचा, तरण्या मुलीचा, नांदगावमध्येच राहतात. त्या म्हणाल्या, “शाहू आणि मी मैत्रिणी होतो. आम्ही कोळवणला एकत्रच शाळेत जायचो. पण आम्ही फक्त पहिलीच शिकलो.” त्या दोघींचं नातंही लागतं. शाहूबाईंचे पती कुसुमताईंचे भाऊ लागतात. मैत्रिणी म्हणून आणि अगदी बहिणींसारख्या त्या एकत्र असायच्या. उखळात धान्य कांडताना त्या जुन्या गळ्यांचा सराव तर करायच्याच पण नवनव्या चालीही तयार करायच्या. याच चाली किंवा गळे नंतर जात्यावर दळणं करताना ओव्यांमध्ये उतरायचे. “आम्ही प्रत्येक जण एकेक किलो तांदूळ किंवा डाळी आणायचो आणि मग एकत्र दळणं करत ओव्या गायचो,” कुसुमताई सांगतात.
जात्यावरच्या ओव्यांच्या संग्रहात शाहूबाईंनी गायलेल्या एकूण ४०१ ओव्या आहेत, त्यातल्या सुमारे १७० ओव्यांचं ध्वनीमुद्रण झालं आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातल्या स्त्रियांनी गायलेल्या एकूण १,१०,००० ओव्यांपैकी या काही ओव्या. आता या ओव्या पारीवर प्रसिद्ध होत आहेत. आणि पारीची टीम यातल्या अनेक गावांना पुन्हा भेटी देत आहे, या कलावंत स्त्रियांना भेटत आहे, फोटो आणि व्हिडिओ गोळा करत आहे.
या मालिकेत दसऱ्यावरच्या तीन ओव्या आहेत. दसऱ्याचा दिवस म्हणजे नवरात्र संपल्यानंतरचा दहावा दिवस. चांगल्याचा वाईटावर विजय, जेव्हा दुर्गेने महिषासुराचा अंत केला तो दिवस. महाभारतामध्ये असं म्हटलंय की पांडवांचा एक वर्षाचा वनवास याच दिवशी संपला. रामायणामध्ये याच दिवशी रामाने रावणाचा वध केला असंही मानलं जातं.
दसऱ्याच्या दिवशी आणि इतरही काही हिंदू सणांच्या दिवशी घरच्या स्त्रिया सणाच्या रितीनुसार, घरच्या पुरुषांचं औक्षण करतात. हातातल्या ताम्हणात, फुलं, कुंकू आणि निरंजन असतं. घरचा पुरुष पाटावर किंवा चौरंगावर बसतो, सुवासिनी त्याच्या कपाळावर टिळा लावते, त्याला ओवाळते. लहान मुलांचंही औक्षण केलं जातं आणि कधी कधी स्त्रियांचंही.